नागपूर : विधानसभा निवडणूक कालावधीत बंडखोरी केली म्हणून झालेले निलंबन अखेर मागे घेण्यात आले आणि आता प्रदेश काँग्रेसने प्रमोशन दिले. माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांचे प्रमोशन करण्यात आले असताना सात महिन्यांपूर्वी प्रभारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिलेले बाबा आष्टणकर यांना मात्र पायउतार व्हावे लागले आहे. तर आश्विन बैस यांना जिल्हाध्यक्षपदी आणले आहे.
माजी मंत्री सुनील केदार गटाने अखेर ग्रामीणमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करीत आपल्या मर्जीतील आश्विन बैस यांना जिल्हाध्यक्षपदी आणले आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या नव्या कार्यकारिणीत विदर्भाला झुकते माप दिले आहे. नागपुरातील तीन नेता पुत्रांना प्रदेश कार्यकारणीत काम करण्याची संधी दिली आहे. मात्र, 13 जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष जाहीर करताना विदर्भातील केवळ नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष बदलण्यात आले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी एकीकडे पक्ष संघटन मजबुतीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा आष्टनकर यांचे प्रयत्न सुरू असतानाच त्यांना बाजूला करण्यात आल्यामुळे केदार गटाची सरशी झाल्याचे दिसत आहे. माजी मंत्री मुकुल वासनिक यांच्यावरही हा कुरघोडी करण्याचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर माजी मंत्री सुनील केदार यांचे वर्चस्व कमी झाल्याचे बोलले जात असताना आता जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी हे फेरबदल घडवून आणल्याने पुन्हा एकदा त्यांचे महत्त्व वाढल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांचे सुपुत्र केतन ठाकरे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत यांना युवक काँग्रेसमधून आता थेट प्रदेश काँग्रेसमध्ये महासचिवपदी बढती देण्यात आली आहे. यासोबतच काटोल विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांच्या विरोधात बंडखोरी करणारे माजी खासदार स्व. डॉ श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवलक्य जिचकार यांचेही नुकतेच निलंबन मागे घेण्यात आले. आता त्यांना देखील प्रदेश महासचिव म्हणून बढती दिली गेली आहे. निलंबन मागे घेण्यात आलेले माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना वरिष्ठ उपाध्यक्ष करण्यात आले आहे. एकंदरीत काँग्रेसमध्ये विधानसभेला निलंबन मागे घेत पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने या नेत्यांना नेता पुत्रांना प्रमोशन दिले आहे. अर्थात त्याचा कितपत फायदा होणार येणारा काळ सांगणार आहे.