

नागपूर : नागपुरात एका बियर बारमध्ये चक्क शासकीय फाईल घेऊन तीन व्यक्ती बसून मद्यपान करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले आहे. मनीष नगर येथील एका बारमध्ये दुपारच्या सुमारासचा हा व्हिडिओ असल्याची माहिती असून त्यातील एक जण दारूचे घोट घेत शासकीय फायली पडताळताना या व्हिडिओत दिसत आहे.
अर्थातच आता महाराष्ट्र शासनाच्या फायलींचा गठ्ठा घेऊन बारमध्ये बसलेले 'हे' अधिकारी नेमके कोण होते, 'ते' कोणत्या विभागाचे होते आणि 'त्यांनी' कोणत्या महत्त्वाच्या फायलींवर बारमध्ये येऊन काही कामकाज केले का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी दारूचे घोट रिचवत बीअर बारमध्ये चक्क 'शासन कारभार' सुरू झाल्याची टीका आता समाज माध्यमांमधून केली जात आहे.
व्हिडिओ व्हायरल होताच या व्हिडिओमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, नागपुरातील मनीषनगर भागातील एका प्रसिद्ध बीअर बारमधील हा प्रकार असून दुपारी 3.30 च्या सुमारास तीन व्यक्ती बारमध्ये आलेत. त्यावेळी त्यांनी आपल्या सोबत एक फायलींचा मोठा गठ्ठा आणला होता. यावेळी त्यांनी दारूची ऑर्डर दिली आणि टेबलवर शासकीय फायलींचा गठ्ठा उघडत त्यांची पडताळणी करण्यास सुरुवात केली. मात्र हे अधिकारी नेमके कोण आणि कोणत्या विभागाचे आहेत हे अद्याप कळू शकलेले नाही. या बारमध्ये जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास, 'हे' अधिकारी कोण हे नक्कीच उघड होणार आहे.
दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील एका महिला वीज कर्मचाऱ्यांची वसुलीच्या नावावर धाब्यावर ओली पार्टी प्रकारही व्हायरल झाला आहे. यवतमाळच्या नेर येथे एमएससीबीच्या कार्यालयातील महिला अधिकारी वसुलीसाठी गेल्या असता ऑन ड्युटी धाब्यावर ओली पार्टी केल्याचे समोर आले आहे. यावेळी महिला कर्मचारी मद्यप्राशन करून अर्वाच्च्य भाषेचा वापर करीत आहे. हा व्हिडिओ सध्या जिल्ह्यात सोशल मीडियावर व्हायरल आहे.