नागपूर

नागपूर: शिवजयंतीनिमित्त राजकीय पोस्टर्सची धूम, स्पर्धांनी वाढविली चुरस

अविनाश सुतार

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एका दिवसावर आली आहे. सोमवारी (दि.१९) गांधीगेट महाल येथील शिवाजी महाराज पुतळ्यायासमोर तसेच शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शिवप्रतिमा, पोस्टर्स, राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांचे फ्लेक्स, भगव्या पताकांनी शहर सजले आहे. यंदा निवडणुकीचे वर्ष असल्याने स्पर्धांच्या आयोजनात राजकीयदृष्ट्या चुरस दिसत आहे. आपणच कसे शिवभक्त हे दाखविण्याचा सर्वांचा प्रयत्न दिसत आहे. तर दुसरीकडे शहरात विविध भागात बाजारात शिवजयंतीनिमित्त ध्वज, पताका व इतर साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे.

परंतु, नागरिकांचा प्रतिसाद कमी प्रमाणात दिसत आहे. 22 जानेवारीरोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरामध्ये उत्साहाचे वातावरण होते, जणू काही दिवाळी साजरी करण्यात आली. त्यावेळेस प्रत्येकाच्या घरावर भगवे ध्वज लावण्यात आले होते. यानिमित्ताने नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर ध्वज खरेदी केली. त्यामुळे शिवजयंतीच्या या ध्वजावर त्याचा परिणाम जाणू लागल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

व्यापाऱ्यांनी शिवजयंती निमित्त वेगवेगळ्या लहान, मोठ्या साईजमध्ये ध्वज विक्रीसाठी आणले आहेत. परंतु ध्वज घेण्यासाठी ग्राहकांची वाट पहावी लागत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मार्केटमध्ये ध्वज घेण्यासाठी प्रतिसाद कमी दिसत आहे आणि बाजारात मंदीचे सावट जाणवत आहे असल्याचे ध्वज विक्रेते छोटू निंबाळकर, दीपक माळी यांनी सांगितले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT