नागपूर : राष्ट्रवादी शरद पवार गटाने कापूस जाळत केला सरकारचा निषेध | पुढारी

नागपूर : राष्ट्रवादी शरद पवार गटाने कापूस जाळत केला सरकारचा निषेध

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारच्या वतीने लवकरच कापूस खरेदी केंद्र सुरु करु असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. परंतु अद्याप एकही खरेदी केंद्र सुरु न झाल्याने आज पांढऱ्या सोन्याला मातीमोल भाव मिळत असल्याचा, शेतकरी हवालदिल झाल्याचा आरोप करीत राज्य सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शनिवारी रस्त्यावर उतरला. युवा नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी काल याविषयी नाराजी बोलून दाखविली. आज जि.प. सदस्य सलील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली

संविधान चौकात कापसाला भाव मिळावा या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. कवडीमोल भाव देणाऱ्या शासन निर्णयाचा विरोध करण्यासाठी कापसाची होळी करण्यात आली. यावेळी सलील देशमुख म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना सन २०१९-२० मध्ये शेवटचे बोंड खरेदी करेपर्यत खरेदी केंद्र सुरु ठेवले होते. साधारणता कापूस मार्च-एप्रिल पर्यतच शासनाच्या माध्यमातून खरेदी करण्यात येतो.परंतु त्याकाळात ऑगष्ट महिन्यापर्यंत खरेदी केंद्र सुरु ठेवून जवळपास ९६ लाख क्विंटल इतकी विक्रमी कापसाची खरेदी झाली होती. यामुळे खुल्या बाजारात सुध्दा कापसाला १४ हजार रुपयापर्यत भाव मिळाले होते. परंतु सध्यस्थीतीत कापसाला बाजारात केवळ ६ हजार ८०० रुपये भाव मिळत आहे. यातून साधा उत्पादन खर्च सुध्दा निघत नसल्याने कापुस उत्पादक अडचणीत आला. केंद्र व राज्यातील सरकार याविषयावर बोलण्यास तयार नसल्याचा सुध्दा आरोप सलील देशमुख यांनी यावेळी केला.

आयात, निर्यात धोरण अत्यंत चुकीचे असल्यामुळे सुध्दा कापसाचे भाव कमी झाले आहेत. कॉटन असोसिएशन ऑफ इंडीयाच्या दबावाखाली मोठया प्रमाणात विदेशातून कापुस हा आयात करण्यात आला. जो परदेशात कापूस निर्यात व्हायला पाहीजे तो झाला नाही. हा जरी विषय केंद्र सरकारचा असला तरी राज्य सरकारने यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे. कापसाला प्रति क्विंटल १४ हजार रुपये भाव देण्याची मागणी यावेळी सलील देशमुख यांनी केली. या आंदोलनात प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button