Ganpati Festival Railway 
नागपूर

Ganpati Festival Railway News: चाकरमान्यांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी रेल्वेची तयारी; कोकणासाठी २६२ विशेष गाड्या

Konkan Railway Special Trains : नागपूर, मुंबई आणि पुण्याहून अतिरिक्त सेवा; १.१७ लाखांहून अधिक आरक्षणे निश्चित

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी तब्बल २६२ विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांची सेवा ९ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, गणेश चतुर्थीच्या १४ सप्टेंबरपूर्वी प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामध्ये २०० आरक्षित तर ६२ अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना मोठी मागणी आहे. मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या २०० आरक्षित विशेष गाड्यांसाठी आतापर्यंत १ लाख १७ हजार ६८२ प्रवाशांची तिकिटे निश्चित झाली आहेत. त्यामुळे यंदाही गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

सावंतवाडीला सर्वाधिक ११२ विशेष सेवा

नागपूरसह राज्यातील विविध भागांतून कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी सावंतवाडी रोडला सर्वाधिक ११२ विशेष सेवा मिळणार आहेत. त्यानंतर रत्नागिरीसाठी ६४, तर मडगावसाठी २४ विशेष सेवा उपलब्ध असतील. त्यामुळे कोकणातील विविध जिल्ह्यांकडे जाणाऱ्या गणेशभक्तांना अतिरिक्त रेल्वे सेवांचा फायदा होणार आहे.

अनारक्षित ६२ गाड्यांचीही सोय

आगाऊ आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने ६२ अनारक्षित विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे ऐनवेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही अतिरिक्त पर्याय उपलब्ध होणार आहेत.

स्थानकांवर गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त व्यवस्था

गणेशोत्सवाच्या काळात स्थानकांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त तिकीट खिडक्या, प्रतीक्षालये आणि रांग व्यवस्थापनाची तयारी केली आहे. तसेच आरपीएफ जवान आणि तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची अतिरिक्त नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रवाशांनी गर्दी टाळण्यासाठी नियोजित वेळेच्या किमान ३० मिनिटे आधी स्थानकावर पोहोचावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण असल्यामुने मध्य रेल्वेच्या या अतिरिक्त सेवांमुळे नागपूरसह मुंबई, पुणे आणि अन्य शहरांमधून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT