

Indian Railways New Fine Rule: भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठीच्या दंडाबाबतचे नियम बदलले असून आता विना तिकीट प्रवास करणे, धुम्रपान करणे, परवानगीशिवाय रेल्वेत वस्तू विकणे, भीक मागणे आणि महिलांच्या आरक्षित डब्यात परवानगीशिवाय बसणे तसेच रेल्वे सुविधांचा चुकीचा वापर करणे महागात पडणार आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यावर जाग्यावर २००० रूपयांचा दंड लागणार आहे.
रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार नवे नियम हे प्रवाशांची सुरक्षा वाढवणे आणि ट्रेनमध्ये शिस्त राखने, नियमांच्या उल्लंघनावर कडक कारवाई करणे हा आहे. मोठ्या दंडापासून वाचण्यासाठी तुम्ही रेल्वे प्रवास सुरू करण्यापूर्वी नव्या नियमांची माहिती करून घेणे खूप गरजेचे आहे. तुमचा प्रवास कोणत्याही अडचणीविना व्हावा असं वाटत असेल तर रेल्वेमध्ये केलेल्या या ७ चुकांसाठी कसा दंड द्यावा लागणार हे जाणून घ्या.
विनातिकीट प्रवास करताना पकडल्यास प्रवाशाकडून प्रवासाचे भाडे आणि नियमांनुसार दंड वसूल केला जातो, ज्याची रक्कम प्रवासाचे अंतर आणि श्रेणीवर अवलंबून असते.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी आरक्षित असलेल्या डब्यात पुरुषांनी विनाकारण प्रवास केल्यास कठोर दंडात्मक कारवाई होऊ शकते.
रेल्वे परिसर किंवा ट्रेनमध्ये धूम्रपान करताना पकडल्यास आता २,००० रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो; सहकार्य न केल्यास न्यायालयात ५,००० रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
रेल्वेच्या मालमत्तेचे (उदा. वेटिंग रूम, आसन) नुकसान करणे किंवा सुविधांचा नियमबाह्य वापर करणे आता अधिक महाग पडू शकते.
रेल्वेची अधिकृत परवानगी न घेता ट्रेन किंवा स्टेशनवर वस्तू विक्री करणाऱ्यांवर आता २,००० रुपयांपर्यंत त्वरित दंड आकारला जातो.
रेल्वे स्टेशन आणि ट्रेनमधील प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून भीक मागणाऱ्यांवर आता २,००० रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली जाते.
ट्रेनमध्ये ज्वलनशील किंवा स्फोटक पदार्थ बाळगणे हा गंभीर गुन्हा असून, यासाठी १०,००० रुपयांपर्यंत दंड किंवा कारावासाची शिक्षा होऊ शकते.