

Sawantwadi Road Railway Station
डोंबिवली : आगामी गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी खासदार नरेश म्हस्केंसह कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. रेल्वे मंत्रालयाने गणेशोत्सव विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून सावंतवाडी रोड स्थानकावर तीन प्रमुख लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर नियमित थांबा मंजूर केला आहे. याबाबतची अधिकृत अधिसूचना शुक्रवारी २४ जुलै रोजी जारी करण्यात आली आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने दिलेल्या सूचनेनुसार रविवारी २६ जुलैपासून सीएसएमटी ते मंगळुरू आणि मंगळुरू ते सीएसएमटी या दैनंदिन एक्स्प्रेसला सावंतवाडी येथे सकाळी ७ वाजून २ मिनिटांनी आणि रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी थांबा मिळणार आहे. तसेच २६ जुलैपासून हजरत निजामुद्दीन ते तिरूवनंतपुरम राजधानी एक्स्प्रेसला सकाळी ६ वाजून १८ मिनिटांनी आणि २८ जुलैपासून तिरूवनंतपुरम ते निजामुद्दीन गाडीला सकाळी ९ वाजून ४४ मिनिटांनी थांबा देण्यात आला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते त्रिवेंद्रम गरीब रथ एक्स्प्रेसला २७ जुलैपासून पहाटे २ वाजून २ मिनिटांनी आणि ३० जुलैपासून पहाटे ३ वाजून २८ मिनिटांनी सावंतवाडी येथे थांबा असेल.
यासोबतच मध्य रेल्वेने गणेशोत्सवासाठी एकूण ६ प्रकारच्या विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. १ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर दरम्यान सीएसएमटी ते सावंतवाडी दरम्यान दैनिक विशेष गाडीच्या १६ फेऱ्या होणार आहेत. ही गाडी सीएसएमटीवरून दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ४ वाजता सावंतवाडीला पोहोचेल. लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी दैनिक विशेष गाडी १ ते २८ सप्टेंबर दरम्यान १७ फेऱ्या चालेल. ही गाडी सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी सुटून रात्री ९ वाजता सावंतवाडीला पोहोचेल. दिवा ते खेड दरम्यान मेमू गाडी १ ते २७ सप्टेंबरपर्यंत रोज सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी धावेल. याशिवाय एलटीटी ते मडगाव, रत्नागिरी, सावंतवाडी, पुणे ते रत्नागिरी साप्ताहिक आणि दिवा ते चिपळूण या विशेष गाड्याही गणेशोत्सव काळात चालवल्या जाणार आहेत.
या निर्णयामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंबई आणि पुण्यातील कोकणवासीयांना गावी जाण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. अतिरिक्त गाड्यांमुळे तिकिटांसाठीची तारांबळ कमी होईल. सावंतवाडी स्थानकावरील नवीन थांब्यांमुळे सिंधुदुर्ग आणि परिसरातील प्रवाशांना तसेच पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे.
गणपती बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात जाणाऱ्या प्रत्येक चाकरमान्याचा प्रवास सुरक्षित आणि वेळेत व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. कोकणवासीयांची मागणी मान्य केल्याबद्दल आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानतो, असे या संदर्भात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या २४ जुलैच्या सूचनेनुसार सावंतवाडी रोड स्थानकावर खालील गाड्यांना थांबा देण्यात आला आहे.
१) सीएसएमटी - मंगळुरू - सीएसएमटी एक्स्प्रेस दैनिक
गाडी क्र. १२१३३ : सीएसएमटी ते मंगळुरू - सावंतवाडी आगमन ०७:०२, प्रस्थान ०७:०४ - २६ जुलै पासून लागू
गाडी क्र. १२१३४ : मंगळुरू ते सीएसएमटी - सावंतवाडी आगमन २३:३०, प्रस्थान २३:३२ - २७ जुलै पासून लागू
२) हजरत निजामुद्दीन - तिरूवनंतपुरम राजधानी एक्स्प्रेस आठवड्यातून ३ दिवस
गाडी क्र. १२४३२ : निजामुद्दीन ते तिरुवनंतपुरम - सावंतवाडी आगमन ०६:१८, प्रस्थान ०६:२० - २६ जुलै पासून लागू
गाडी क्र. १२४३१ : तिरुवनंतपुरम ते निजामुद्दीन - सावंतवाडी आगमन ०९:४४, प्रस्थान ०९:४६ - २८ जुलै पासून लागू
३) लोकमान्य टिळक टर्मिनस - त्रिवेंद्रम गरीब रथ एक्स्प्रेस आठवड्यातून २ दिवस
गाडी क्र. १२२०१ : एलटीटी ते त्रिवेंद्रम - सावंतवाडी आगमन ०२:०२, प्रस्थान ०२:०४ - २७ जुलै पासून लागू
गाडी क्र. १२२०२ : त्रिवेंद्रम ते एलटी - सावंतवाडी आगमन ०३:२८, प्रस्थान ०३:३० - ३० जुलै पासून लागू
मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी ६ प्रकारच्या विशेष गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
रेल्वे पत्र क्र. टी.३२/एक्स-१२/गणपती स्पेशल्स/२०२६ : २४ जुलै नुसार
१) सीएसएमटी - सावंतवाडी - सीएसएमटी दैनिक स्पेशल
गाडी क्र. ०१०३ / ०११०४ : ११ ते २७ सप्टेंबर - एकूण १६ फेऱ्या
सीएसएमटी सुटेल १५:३०, सावंतवाडी आगमन ०४:०० दुसऱ्या दिवशी
थांबे : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ
२) एलटीटी - सावंतवाडी - एलटीटी दैनिक स्पेशल
गाडी क्र. ०१७१ / ०१७२ : १ ते २८ सप्टेंबर २०२६ - एकूण १७ फेऱ्या
एलटी सुटेल ०८:२०, सावंतवाडी आगमन २१:०
थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली
३) दिवा - खेड - दिवा मेमू दैनिक
गाडी क्र. ०११५५ / ०११५६ : ११ ते २७ सप्टेंबर २०२६ - एकूण १६ फेऱ्या
दिवा सुटेल ०७:१५, खेड आगमन १४:३५
थांबे : निळजे, तळोजा, कलंबोली, पनवेल, पेन, माणगाव
४) एलटीटी - मडगाव/रत्नागिरी/सावंतवाडी
गाडी क्र. ०११६५ / ०११८५ : साप्ताहिक व द्विसाप्ताहिक फेऱ्या - विशेष वेळेनुसार
थांबे : ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ, थिविम
५) पुणे - रत्नागिरी - पुणे साप्ताहिक स्पेशल
गाडी क्र. ०१४५ / ०१४४७ : १२ ते २६ सप्टेंबर २०२६
पुणे सुटेल ००:२५ मध्यरात्री, रत्नागिरी आगमन ११:५०
थांबे : चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल
६) दिवा - चिपळूण - दिवा
गाडी क्र. ०१३३ / ०१३४ : १ ते २८ सप्टेंबर २०२६ - एकूण १५ फेऱ्या
दिवा सुटेल १३:४०, चिपळूण आगमन २१:३०
थांबे : पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड