

मुंबई: रेल्वे प्रवाशांची होणारी गैरसोय आणि वाढत्या वाहतूक व्यवस्थेचा विचार करून पश्चिम रेल्वेने आपले सुधारित उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक सोमवारी जाहीर केले. तसेच मुंबईकरांसाठी ६ नव्या लोकल आणि २ एसी लोकल सुरू करण्यात आल्याचेही जाहीर केले.
या नव्या लोकलमुळे दादर-डहाणू रोड थेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. त्याचा मोठा फायदा मुंबईकरांना होणार असून आजपासून ( १ सप्टेंबर ) पश्चिम रेल्वे आपल्या नव्या वेळापत्रकाने धावणार आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत एकूण १ हजार ४१४ उपनगरीय लोकल आहेत. त्यात दोन अप आणि चार डाऊन अशा सहा नव्या लोकल सुरू करण्यात येणार आहेत. आठवड्याच्या कामकाजाच्या दिवशी एसी लोकलची संख्या १४५ वरून १४७ करण्यात आली आहे. शनिवार आणि रविवारी एकूण ११६ वातानुकूलित सेवा धावणार आहेत.
दादर-डहाणू रोड थेट लोकल
प्रवाशांसाठी दादर ते डहाणू रोड थेट लोकल सुरु करण्यात आली आहे. दादर-विरार आणि विरार-डहाणू रोड या लोकल एकत्रित होणार आहेत. सुधारित लोकल दादरहून सायंकाळी ५.२२ वाजता सुटेल आणि सायंकाळी ७.३० वाजता डहाणू रोडला पोहोचेल.
विरार–दादर लोकल चर्चगेटपर्यंत
सकाळी ८.२३ वाजताची विरार-दादर आता चर्चगेटपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. ही गाडी चर्चगेटला सकाळी ९.४८ वाजता पोहोचेल. तसेच दादर-विरार ही लोकल आता चर्चगेटहून सकाळी ९.५२ वाजता सुटून नालासोपारापर्यंत धावेल. विशेष म्हणजे या दोन नॉन-एसी लोकल आता एसी लोकल म्हणून धावणार आहेत.
अशा आहेत ६ नव्या लोकल
वांद्रे - चर्चगेट : वांद्रे येथून सकाळी ११.५८ वाजता सुटून दुपारी १२.३० वाजता चर्चगेटला पोहोचेल.
विरार-बोरिवली : विरार येथून रात्री ११.५१ वाजता सुटून मध्यरात्री १२.२६ वाजता बोरिवलीला पोहोचेल.
भाईदर -विरार : सकाळी ७.४६ वाजता सुटणार,
बोरिवली- भाईदर : रात्री १०.१४ वाजता सुटणार
बोरिवली- विरार : रात्री १०.५१ वाजता सुटणार
बोरिवली- भाईदर : मध्यरात्री १२.२८ वाजता सुटणार
काही महत्वाचे बदल
चर्चगेटहून सायंकाळी ५.२८ वाजता सुटणारी लोकल आणि बोरिवलीहून सायंकाळी ६.२४ वाजता सुटणारी लोकल आता एसी ट्रेन म्हणून धावणार आहे. या दोन्ही लोकलचे मार्ग आणि वेळा पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत.
चर्चगेटहून सायंकाळी ६.२२ व ७.०५ वाजता सुटणाऱ्या लोकल आता बोरिवली स्थानकावर थांबणार नाहीत.
चर्चगेट-बोरिवली सकाळी १०.२४ वाजता सुटणारी एसी स्लो लोकल आता गोरेगाव पर्यंतच धावेल. ही गाडी आता चर्चगेट-गोरेगाव एसी स्लो अशी करण्यात आली आहे.
बोरिवली-चर्चगेट एसी लोकलऐवजी आता गोरेगाव-चर्चगेट एसी स्लो लोकल सुरू राहील. ही लोकल गोरेगावहून सकाळी ११.३९ वाजता सुटेल.