नागपूर

Nagpur FDA action : मृत उंदीर आढळल्याने ‘हिरा स्विट’चे उत्पादन युनिट सील; FDAची मोठी कारवाई

पाचपावलीतील मिठाई उत्पादकाचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित; स्वच्छतेतील त्रुटींमुळे उत्पादन थांबविले

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : येथील प्रसिद्ध मिठाई उत्पादक ‘हिरा स्विट प्रा. लि.’ च्या पाचपावली येथील उत्पादन युनिटवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. नियमित तपासणीदरम्यान उत्पादन परिसरात एका भिंतीजवळ मृत उंदीर आढळून आला. तसेच स्वच्छतेशी संबंधित अनेक त्रुटी निदर्शनास आल्यानंतर एफडीएने संबंधित युनिटचा उत्पादन परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. परवाना निलंबित होताच या युनिटमधील मिठाई व नमकीनचे उत्पादन तात्काळ बंद करण्यात आले आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या नागपूर अन्न शाखेतील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ३ जुलै रोजी पाचपावली येथील हिरा स्विटच्या उत्पादन युनिटची नियमित तपासणी केली. या तपासणीत कारखान्याच्या परिसरातील एका भिंतीजवळ मृत उंदीर आढळून आला. हा उंदीर उत्पादन साहित्यापासून दूर असल्याची नोंद अधिकाऱ्यांनी केली असली तरी अन्न सुरक्षा नियमांनुसार स्वच्छतेच्या बाबतीत गंभीर त्रुटी असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. तपासणीदरम्यान काही ठिकाणी धूळ व घाण आढळली. तसेच काही भांड्यांना गंज, लोखंडी पत्र्यांवर गंज आणि स्वच्छता व्यवस्थेतील इतर त्रुटीही आढळून आल्या. या सर्व बाबींची नोंद करून एफडीएने कंपनीला नोटीस बजावली.

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून परवाना निलंबित

तपासणीनंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून ६ जुलै रोजी हिरा स्विटच्या पाचपावली उत्पादन युनिटचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला. त्यानंतर संबंधित युनिटमधील सर्व उत्पादन प्रक्रिया थांबविण्यात आली. हिरा स्विटच्या मिठाई व नमकीनची विक्री देशातील विविध बाजारपेठांसह काही परदेशी बाजारपेठांमध्येही केली जाते. त्यामुळे एफडीएच्या या कारवाईमुळे मिठाई उद्योगात खळबळ उडाली आहे.

कारवाई केवळ एका युनिटपुरती मर्यादित

एफडीएची कारवाई हिरा स्विटच्या पाचपावली येथील एका उत्पादन युनिटपुरती मर्यादित आहे. कंपनीच्या दोन स्वतंत्र फर्म असून त्या दोन भावांच्या मालकीच्या आहेत. दुसऱ्या उत्पादन युनिटचा या कारवाईशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच शहरातील विक्री केंद्रांबाबत एफडीएच्या आदेशात कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. कंपनीची बाजू जाणून घेण्यासाठी संचालक महेश वझिरानी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता.

त्रुटी दूर केल्यानंतर होणार पुनर्तपासणी

एफडीएच्या माहितीनुसार, कंपनीला तपासणीत आढळलेल्या सर्व त्रुटी दूर कराव्या लागणार आहेत. त्यानंतर कंपनीला अपील करता येणार असून, अपील प्राप्त झाल्यानंतर एफडीएकडून पुन्हा तपासणी केली जाईल. आवश्यक सुधारणा झाल्याचे आढळल्यास नियमानुसार परवाना निलंबन मागे घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

“पाचपावली येथील हिरा स्विट प्रा. लि.च्या उत्पादन युनिटच्या तपासणीत एका भिंतीजवळ मृत उंदीर आढळला. तसेच स्वच्छतेशी संबंधित इतर त्रुटीही निदर्शनास आल्या. त्यामुळे उत्पादन परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे. कंपनीने त्रुटी दूर केल्यानंतर तपासणी करून नियमानुसार पुढील निर्णय घेतला जाईल.”
सचिन केदारे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग (अन्न), नागपूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT