Bacchu Kadu Protest
नागपूर : राजेंद्र उट्टलवार
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी नागपूरचे महत्त्वाचे महामार्ग रोखून धरल्याने कालपासून हजारो नागरिक वेठीस धरले गेले आहेत. आज, मंगळवारी दुसऱ्या दिवशीही महामार्गावरील परिस्थिती 'जैसे थे' आहे. आंदोलकांनी वर्धा रोडवरील ज्या ठिकाणी चक्काजाम केला, तो परिसर देशाच्या चारही दिशांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांचा केंद्रबिंदू आहे. 'देशाची नाडी' दाबून सरकारवर दबाव आणण्याची कडू यांची ही चाल आहे. कोणते महामार्ग ठप्प? जाणून घ्या सध्याची परिस्थिती...
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती आंदोलनासाठी आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या आंदोलकांनी नागपूरजवळील अत्यंत मोक्याचे ठिकाण निवडण्यामागे एक पद्धतशीर आणि व्यापक रणनीती असल्याचे स्पष्ट झाले आहे. आंदोलकांनी वर्धा रोडवरील ज्या ठिकाणी चक्काजाम केला, तो परिसर देशाच्या चारही दिशांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांचा केंद्रबिंदू आहे.
प्रशासन बुटीबोरी येथून निघालेल्या आंदोलकांना परसोडी येथील केंद्रीय कापूस अनुसंधान केंद्र परिसरात रोखण्याच्या तयारीत असताना 'गनिमी काव्या'ने बच्चू कडू यांनी नियोजित स्थळाच्या आधीच या रस्त्यावर 'चक्काजाम' सुरू केला. आंदोलक चारही दिशांना पसरल्याने प्रशासनाच्या सर्व योजना फोल ठरल्या आणि परिस्थिती त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेली.
या जागेवरून वर्धा, चंद्रपूर, हैदराबाद, जबलपूर, रायपूर, अमरावती, मुंबई हायवे त्याचप्रमाणे कन्याकुमारी, कोलकत्ता, दिल्ली अशा चारही बाजूंनी वाहने ये-जा करतात. त्यामुळे पद्धतशीर नियोजनातून या आंदोलनाची रणनीती आखली आहे. कालपासून आंदोलनामुळे अत्यंत महत्त्वाचे महामार्ग पूर्णपणे ठप्प झाले आहेत, ज्यामुळे देशाच्या विविध भागांतील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. खालील महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे.
नागपूर ते वर्धा
नागपूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग
नागपूर कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग
नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग
नागपूर मुंबई व्हाया अमरावती
वर्धा रोडवरील शेतकरी आंदोलन, वाहतूक कोंडी यामुळे नागपुरातून जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आहे. जबलपूर, रायपूर, अमरावतीची वाहने कोराडी, कामठी आउटर रिंगरोडमार्गे जाऊ शकतात. शहर वाहतूक पोलिसांनी वाहनचालक, प्रवाशांना वर्धा रोड टाळण्याचे आवाहन केले आहे. नागपूर, वर्धा, तुळजापूर, चंद्रपूर, हैदराबादसाठी पर्यायी मार्गाचा वापर करता येईल. नागपूरहून वर्ध्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खापरी पोलिस चौकीसमोर डावीकडे वळून, सेझ क्षेत्रातून पुढे जाण्याचा आणि नंतर सर्व्हिस रोडवर डावीकडे वळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तेथून, त्यांनी हॉटेल ली मेरिडियनजवळ उजवीकडे वळून, पांजरा गाव आणि बाह्य रिंग रोड पुलावरून पुढे जावे आणि वर्ध्याकडे जाण्यासाठी पांजरा टोल प्लाझा येथे डावीकडे वळावे.
दरम्यान, वर्ध्याहून नागपूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी चालकांनी जामठा चौकी येथून डावीकडे वळण घ्यावे, एनसीआयकडे जावे, यू-टर्न घ्यावा आणि नंतर मेट्रो रेल्वे यार्ड आणि सिमेंट फॅक्टरीजवळ डावीकडे वळावे. डीपीएस स्कूल टी-पॉइंटवरून, त्यांनी उजवीकडे वळण घ्यावे, त्यानंतर मिहान डब्ल्यू बिल्डिंगजवळ दुसरे उजवीकडे वळावे, नंतर इंडियन ऑइल कंपनी आणि खापरी पोलिस चौकीमार्गे नागपूरकडे जाणाऱ्या पुलावरून पुढे जायचे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा सुरू असतानाच बच्चू कडू यांनी आंदोलन अधिक तीव्र करून अचूक टायमिंग साधले आहे. या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनही अतिशय खबरदारी घेत आहे.
दरम्यान, जर चर्चेतून समाधानकारक तोडगा निघाला नाही, तर 'गनिमी कावा' वापरून रेल्वे वाहतूक रोखण्याचा आंदोलकांचा निर्धार कायम आहे. पोलिसांनी आंदोलकांना कोणत्याही परिस्थितीत रोखण्याची तयारी केली असून, दुसरीकडे आंदोलकांनी पोलिसांना गुंगारा देत आपला उद्देश साध्य करण्यासाठीची रणनीती आखली आहे. त्यामुळे पुढील काही तास नागपूरमध्ये आंदोलनाबाबत महत्त्वाचे आणि तणावपूर्ण ठरू शकतात.
महामार्गावर चक्काजाम करत आंदोलकांनी आज (दि. २९) दुपारी १२ वाजेपर्यंत राज्य सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी जो 'अल्टिमेटम' दिला होता, तो आता संपला आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून लवकरच आंदोलकांशी संवाद साधला जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्य सरकारचे संकट मोचक मंत्री गिरीश महाजन यांनी बच्चू कडू यांच्याशी मोबाईलवरून साधलेला संवाद निरर्थक ठरला. दुसरीकडे सर्व शेतकरी नेत्यांशी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून मुंबईत आयोजित बैठकीत यायचे की नाही याविषयीचा निर्णय कळवतो, असे बच्चू कडू यांनी गिरीश महाजन यांना सांगितले आहे.
मंगळवारपासूनच नागपूरचे तिन्ही महामार्ग बंद आहेत त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. आता लहान रस्ते देखील आंदोलकांकडून बंद केले जात आहेत. बच्चू कडूंच्या आंदोलनाला समर्थकांचा पाठिंबा वाढत असतानाच आंदोलक रस्त्यांवर काटे, दगड आणि लाकडे टाकून बंद करत आहेत. आंदोलनाची तीव्रता वाढत असताना सरकारने मात्र दुर्लक्ष केले आहे. आंदोलन स्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे.
आज सकाळी शेतकऱ्यांनी नागपूर-मुबंई समृद्धी महामार्ग रोखला. सरकारने दखल घेतली नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी महामार्गावर वाहनांची वाहतूक पूर्णपणे रोखली. हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीचा निर्णायक लढा असल्याचे सांगत, स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी सरकारला इशारा दिला. "सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही आणि सरसकट कर्जमाफीवर ठोस भूमिका घेतली नाही, तर राज्यभरातील शेतकऱ्यांचा प्रचंड उद्रेक होईल, असे ते म्हणाले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, पोलिस प्रशासन सतर्क आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन मागे हटणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.