

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्यालयात रविवारी झालेले दिवाळी मिलन कार्यक्रम आणि यावेळी ''वाजले की बारा...!'' 'प्रीतीच्या झुल्यात झुलवा' अशा ठसकेबाज लावण्याची झालेली प्रस्तुती राज्यभर व्हायरल झाल्यानंतर आता शहर अध्यक्षच अडचणीत आले आहेत. पक्षश्रेष्ठींनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांना सात दिवसात खुलासा करण्यास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले आहे.
हा लावणीचा व्हिडिओ सोमवारी (दि.२७) राज्यभरात चर्चेत आला. दोन महिन्यांपूर्वी प्रशांत पवार यांना हटवून प्रदेश उपाध्यक्ष अनिल आहिरकर यांच्याकडे शहर अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. ग्रामीण राजाभाऊ टाकसाळे यांना सोपवले. आता पक्ष कार्यालयातच झालेला लावणीचा कार्यक्रम त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.
नागपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंतन शिबिर घेतले. अनेकांचे कान टोचले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत नागपुरात गणेश पेठ परिसरात या कार्यालयाचे उद्घाटनही पार पडले. पक्ष संघटन वाढीच्या दृष्टीने नव्या,जुन्याचा समावेश असलेली कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. एकीकडे पक्ष वाढीसाठी प्रयत्न आणि महायुतीत सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी सुरू असताना अजित दादांच्या राष्ट्रवादीला यानिमित्ताने बॅक फुटवर जावे लागण्याची शक्यता आहे. लावणी कलावंत असलेल्या शिल्पा शाहीर यांच्या वाजले की बारा...लावणीची पक्षश्रेष्ठीनी गंभीर दखल घेतली आहे. स्वतः त्यांनी आपला कलावंत म्हणून सत्कार झाला. मी राष्ट्रवादीची कार्यकर्ता आहे. एक कलावंत म्हणून आपणास आग्रह झाला. मी लावण्या सादर केल्या. यावेळी वन्समोअरची घोषणाबाजीही व्हिडिओत आहे. शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे आणि इतर पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अनिल अहिरकर यांच्या मते यात काहीच गैर नाही.
पक्षातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांमधील कला गुणांना या कौटुंबिक दिवाळी मिलन निमित्ताने प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम होता. अनेकांनी आपल्या कलांचे सादरीकरण केले. यातच ही लावणी देखील सादर झाली, असे सांगितले. अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या या नृत्य, नाचगाणी कार्यक्रमाची चित्रफित व्हायरल झाल्याने पक्षाची प्रतिमा मलीन झाली. यामुळे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार आपला लेखी खुलासा सात दिवसात सादर करावा, असे या पत्रात सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांनी म्हटले आहे.