

Bacchu Kadu Mahaelgar Morcha Nagpur:
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी राज्य सरकारला आज (बुधवार) दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. या वेळेत मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे जाम करण्याचा इशारा कडू यांनी दिला आहे. 'कर्जमाफी घेतल्याशिवाय माघार नाही,' अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.
शेतकऱ्यांचे महाएल्गार आंदोलन अमरावतीतून सुरू झाले, वर्धा येथे मुक्काम करून काल नागपुरात पोहोचले. बच्चू कडू आणि आंदोलकांनी काल रात्रभर नागपूरच्या हायवेवरच मुक्काम केला. त्यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे.आ
शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर काढलेल्या रात्रीबद्दल बोलताना बच्चू कडू अत्यंत भावूक झाले.
"रात्र चांगलीच गेली. शेतकऱ्यांसोबत होती. शेतातून घरात राहून सगळी चिंताच आहे ना? तीन-तीन, चार-चार लाखांचं कर्ज शेतकऱ्यांच्या डोक्यावर आहे. कुठलीही अपेक्षा नाही, कुठूनही काही पैसे येण्याची कुठलीही वाट शिल्लक नाही की हे पैसे कसे फेडणार. व्याजावर व्याज होईल ते कसं देणार, पुढच्या वर्षीची पेरणी कशी होईल, अनेक चिंता आहेत."
ते पुढे म्हणाले, "आम्ही आमच्यासाठी रात्र काढली नाही. सामान्य शेतकऱ्यांचं भलं व्हावं, त्याची आत्महत्या थांबावी, एवढाच प्रयत्न आहे."
बच्चू कडूंनी शेतकऱ्यांसाठी कोणत्याही अटीशिवाय संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली आहे. या प्रमुख मागणीसाठीच त्यांनी महाएल्गार मोर्चा काढला आहे.
नियमीत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा
आपात्कालीन संकटामुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर २० टक्के अनुदान द्या
यावर्षी उसाला प्रती टन ४ हजार ३०० रूपये एफआरपी द्या
कांद्याला किमान ४० रूपये किलो हा दर द्या, कांद्यावरील निर्यात बंदी, निर्यातमूल्य कायमचे हटवा
गाईच्या दुधाला प्रतिलीटर ५० रूपये तर म्हैशीच्या दुधाला प्रतिलीटर ६५ रूपये दर द्या
आंदोलनामध्ये शेतकरी, मेंढपाळे, मच्छीमार, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसोबत दिव्यांग बांधवही मोठ्या संख्येने सामील झाले आहेत.
दिव्यांगासाठी देखील बच्चू कडू यांनी सरकारकडे मागण्या केल्या आहेत.
केरळप्रमाणे दिव्यांगांना दरमहा ₹६,००० रुपये मदत मिळावी (सध्या फक्त १ हजाराची वाढ)
प्रत्येक दिव्यांगाला अंत्योदय कार्ड देण्यात यावे.
सर्व रोजंदारी मजूरांचा मनरेगामध्ये समावेश करून प्रती महिना १ हजार रूपये मजुरी द्या
मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी, अशी मागणी असताना चंद्रशेखर बावनकुळे मध्यस्थी करण्यासाठी पुढे येऊ शकतात, अशा चर्चा आहेत. यावर बच्चू कडू यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
"बावनकुळे येवो, वनकुळे येवो, का दोन कुळे असो, आम्हाला त्याचं काही नाही. चर्चा आम्ही बावनकुळेंना सरकार म्हणून पाहू. आमचा कोणी दुश्मन नाहीये. प्रश्न एकच आहे की, हे सगळं जर त्यांच्या मनात असतं तर त्यांना निर्णय लवकर घेतला पाहिजे."
"तुम्ही शेतकऱ्याला रक्तबंबाळ झाल्यानंतर निर्णय घ्याल तर हे पाप तुमच्या नशिबी येणार का नाही येणार? लवकरात लवकर सरकारने चर्चेसाठी यावं," असे आवाहन त्यांनी केले.
आंदोलनामुळे महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना त्रास होत आहे. यावर बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
"इथं कोण मुख्य आहे, महाराष्ट्राचं मी का मुख्यमंत्री आहे? हा प्रश्न मुख्यमंत्र्याला विचारायला पाहिजे का मला विचारायला पाहिजे? दोष त्यांच्यात आहे, आमच्यात नाही. त्यांच्या धोरणामध्ये दोष आहे, म्हणून आम्ही इथे आलो."