नागपूर: पुढारी वृत्तसेवा : गांधीवादी विचारवंत आणि भाषातज्ज्ञ दिवाकर मोहनी यांचे निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. दिवाकर मोहनी यांनी मरणोत्तर देहदान केले. आज (दि. २०) त्यांचे पार्थिव दान करण्यात आले.
दिवाकर मोहनी यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1931 रोजी नागपुरात झाला. गांधीवादी कुटुंबात जन्मलेले दिवाकर मोहनी हे मुद्रण आणि देवनागरी लिपीचे अभ्यासक होते. मराठीतील बुद्धिवादाच्या 'आजचा सुधारक' मासिकाचे माजी संपादकही होते. स्त्री स्वातंत्र्य, धर्म, संपत्तीचे स्वरूप यासह विविध विषयांवर त्यांनी तर्कसंगत आणि नवीन वैचारिक तत्त्वज्ञान मांडले. त्यांचे देवनागरी लिपीवरील 'माय मराठी… कशी लिहावी…कशी वाचावी..' हे पुस्तक लिपीवरील संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते.
ज्येष्ठ विधिज्ञ के. एच. देशपांडे यांच्याशी त्यांचे घनिष्ठ कौटुंबिक संबंध होते. त्यांच्या विनंतीवरुन सुप्रसिद्ध कामगार नेते आणि राज्यसभा सदस्य पु. य. देशपांडे यांनी लिखित "अमृतानुभव रसरहस्य" या संत ज्ञानेश्वरांच्या भाष्यावर लेखन केलेल्या पाच खंडात प्रसिध्द झालेल्या ग्रंथाचे पुनर्प्रकाशन करण्यात दिवाकर यांनी मोलाचे सहकार्य केले. हा ग्रंथ मुद्रित व प्रकाशित करुन विजय लपालीकर व अॕड. राजीव देशपांडे यांच्यासह केलेल्या या सांधिक कार्यामुळे महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील तत्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांना अमूल्य वैचारिक देणगी मिळाली आहे.
दिवाकर यांचे मातृसेवा संघाशी अतूट नाते होते. त्यांच्या भगिनी कमलाताई होस्पेट यांनी ही संस्था उभी केली. दिवाकर यांना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे भाशाव्रती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या 'शुद्धलेखनाचे तत्त्वज्ञान' या पुस्तकासाठी त्यांना विदर्भ साहित्य संघातर्फे डॉ. व्ही. व्ही. मिराशी स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, मुलगा भरत, तर मुलगी अनुराधा, यशोदा सावरकर असा परिवार आहे.
हेही वाचा