नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील धानला येथील रहिवासी रतन शेंडे (वय ५०) या पित्याने मुलगा अश्विनी रतन शेंडे (२५) याची दारूच्या नशेत असताना लाठीने मारहाण व गळा आवळून खून केला. दारुच्या नशेत नेहमी पित्याचा वाद होत होता. मद्यधुंद अवस्थेत मृतक अश्विनी हा पित्याला मारहाण करायचा. या दोघात कड्याक्याचे भांडण होत होते. रविवारी अश्विनी नेहमीप्रमाणे दारु पिण्यासाठी मौदा तालुक्यातील बोरगांव येथे गेला.
दारु पिल्यावर अश्विनी ऐका बंद पानठेल्याच्या कडेला झोपला असतांना संधी साधत बाप रतन तेथे आला. अश्विनी झोपेत असताना संतापाच्या भरात त्याला लाठीने मारुन त्याचा खून केला. यानंतर हा खून नव्हे तर आत्महत्या आहे असे दाखवण्याचा प्रयत्नात अश्विनच्या गळ्याला नायलॉन दोरीने आवळले. मात्र, रतनने रचलेला कट अखेर फसला.
मिळालेल्या माहितीनुसार मागील तीन दिवसापासून अश्विनी वडील रतन यांची गाडी घेऊन जात असल्याच्या कारणावरुण हा वाद झाला होता. मुलाच्या खुनप्रकरणी पिता रतन शेंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माहिती मिळताच मौदा पोलीस निरीक्षक हेमंत खराबे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.