नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शनिवारी (दि. १७) रात्रीपासून पाचपावली पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील फारुखनगरमधून दोन सहा वर्षीय मुलींसह चार वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याने खळबळ माजली होती. सीसीटीव्ही फुटेजमधूनही फारसे काही हाती न लागल्यामुळे अखेरीस पोलिसांनी रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरातील रूग्णालयासह इतरही गर्दीच्या ठिकाणी शोध घेतला. परंतु काहीच सुगावा लागला नाही. अखेरीस रविवारी (दि. १८) सायंकाळी घराजवळच असलेल्या एका कारमध्ये या तीनही मुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, ही मुले खेळता खेळता कारमध्ये बसली आणि कारचे दरवाजे पुन्हा न उघडल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती गुन्हे शाखेचे प्रमुख मुकम्मा सुदर्शन यांनी दिली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परिसरात एक कार गॅरेज, भंगार कारखाना तसेच काही ओसाड घरे आहेत. यामुळे सर्व संशयीत ठिकाणी झोन 3 उपायुक्त गोरख भामरे यांच्यासह पोलीस पथके या बेपत्ता चिमुकल्यांचा शोध घेत होती. रविवारी (दि. १८) सायंकाळी परिसरात घरझडती घेण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. दरम्यान, फारूख नगरातीलच एका भंगार गाडीत तीनही बेपत्ता मुलांचे मृतदेह सापडले. फिरोज खान भुग्गा खान (वय २८) हे फारूख नगरातील साकीर अंसारी यांच्या घरी भाड्याने राहतात. त्यांची आलिया फिरोज खान (वय ६) व तौफिक फिरोज खान (वय ४), आफरिन इर्शाद खान (वय ६) ही दोन तीन मुले बेपत्ता झाली. फारूख नगरला लागून असलेल्या खंते नगर येथील पिवळ्या शाळेच्या मैदानावर ही मुले खेळायला गेली होती. परंतु सायंकाळ होऊनही घरी परतले नसल्याने आसपासचे परिसरात तसेच परिचितांकडे शोध घेतल्या नंतर रात्री पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. आज या मुलांच्या मृत्यूने या कुटुंबासह परिसर हादरला.
नुकतीच इतवारी रेल्वेस्थानकातून अपहरण केलेल्या मुलीची सीसीटीव्ही आणि एका ऑटोचालकांच्या मदतीने रेल्वे पोलिसांनी तीन साडेतीन तासात सुटका केली होती. पश्चिम बंगालमधील एक गृहस्थ त्यांच्या तीन वर्षाच्या मुलींसह तिकीट काऊंटरवर उभे होते. वडील तिकीट काढण्यात गुंतलेले असताना मुलगी बाजूला खेळत होती. वडीलांचे लक्ष नाही असे पाहून आरोपीने मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून इतवारी रेल्वेस्थानकातून पळ काढला. शामकुमार ध्रुव पुनितराम (वय ३०, छत्तीसगड) असे या आरोपीचे नाव आहे.राजू दिलीप छत्रपाल हे मुलीच्या पित्याचे नाव आहे. या घटनेमुळे लहान बेपत्ता मुलांचे अपहरण करणारे एखादे रॅकेट तर सक्रिय नाही ना, अशी शंका वर्तविली जात होती. आता या घटनेने पुन्हा एकदा मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.