Gadchiroli Surrendered Naxalites Surgery  Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Surrendered Naxalites | आत्मसमर्पित नक्षलवाद्यांवर ‘सर्च’मध्ये मणका, खांद्याच्या शस्त्रक्रिया

मुंबई येथील ‘द स्पाईन फाऊंडेशन’च्या माध्यमातून ‘सर्च’मध्ये मणक्याच्या शस्त्रक्रियांचे शिबिर

पुढारी वृत्तसेवा

Gadchiroli Surrendered Naxalites Surgery

गडचिरोली : आत्मसमर्पण करून समाजाच्या मुख्य प्रवाहात परतलेल्या नक्षलवाद्यांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘सर्च’कडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच उपक्रमांतर्गत नुकत्याच तीन आत्मसमर्पित नक्षलवाद्यांवर मणक्याच्या, तर एका नक्षलवाद्यावर फ्रोजन शोल्डरसाठी आर्थोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

मुंबई येथील ‘द स्पाईन फाऊंडेशन’च्या माध्यमातून २३ ते २५ जुलैदरम्यान ‘सर्च’मध्ये मणक्याच्या शस्त्रक्रियांचे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात सरोज सलाकुला, भिमन्ना कुळमेथे आणि रतन येलमे या आत्मसमर्पित नक्षलवाद्यांवर मणक्याच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तिन्ही रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

सरोजा सलाकुला (वय ५६) या तरुण वयातच नक्षलवादी चळवळीत सहभागी झाल्या होत्या. २०२३ मध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यानंतर पाठीच्या वेदनांचा त्रास वाढला. सरोजा आणि त्यांचे पती विवेक रेड्डी यांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये आत्मसमर्पण केले होते.

‘द स्पाईन फाऊंडेशन’चे प्रमुख डॉ.शेखर भोजराज यांनी सांगितले की, तिन्ही रुग्णांच्या कंबरेतील मणक्याची चकती सरकली होती. त्यामुळे मज्जातंतूंवर दबाव येऊन वेदना वाढत होत्या. तिन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, १६ ऑगस्ट रोजी विमल कुळमेथे (६२) यांच्यावर फ्रोजन शोल्डरसाठी आर्थोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबई येथील तज्ज्ञ डॉ. चिंतन देसाई यांनी ही शस्त्रक्रिया केली. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांना खांदेदुखीचा त्रास होता. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती सुधारत आहे.

‘सर्च’चे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता भलावी यांनी सांगितले की, मणक्याच्या शस्त्रक्रिया झालेल्या तिन्ही रुग्णांना सुटी देण्यात आली असून त्यांना काही दिवस फिजिओथेरपीची आवश्यकता आहे.

‘सर्च’चे अस्थिविकार तज्ज्ञ डॉ. आदित्य अग्रवाल यांनी सांगितले की, आत्मसमर्पित नक्षलवाद्यांमध्ये विविध आरोग्यविषयक समस्या आढळून येतात. त्यांच्यावर ‘सर्च’मध्ये आवश्यक उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत.

यापूर्वी केली होती नसबंदी रिओपनिंग

यापूर्वी मार्च महिन्यात 'सर्च' मध्ये १४ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांवर पुरुष नसबंदी रिओपन करण्याच्या शस्त्रक्रियाही करण्यात आल्या आहेत. आरोग्यसेवेच्या माध्यमातून आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रयत्नांना यामुळे बळ मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT