गडचिरोली

Gadchiroli news: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचे गडचिरोलीत पडसाद; विद्यार्थ्यांकडून शांततापूर्ण निषेध

Sonam Wangchuk protest: 'निर्माण' चळवळीचे प्रमुख अमृत बंग यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी दिल्ली येथे सुरू केलेल्या आंदोलनाचे पडसाद आज गडचिरोलीत उमटले. वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी 'निर्माण' संघटनेच्या वतीने येथील विद्यार्थ्यांनी आज शांततापूर्ण निदर्शने केली.

शहरातील प्रमुख मार्गांवरून काढलेल्या या शिस्तबद्ध मोर्चात 'निर्माण'शी संबंधित सुमारे ७० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी 'नीट' (NEET) परीक्षेतील गैरप्रकार आणि पेपर फुटीच्या घटनांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

विद्यार्थ्यांच्या हातात 'आवाज दाबला तरी सत्य थांबत नाही', 'प्रश्न विचारणे हा लोकशाही अधिकार आहे', 'प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय द्या' आणि 'सोनम वांगचूक यांना पाठिंबा' असे फलक झळकत होते. तसेच 'आवाज उठेगा, बदलाव आयेगा' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. 'नीट' गैरप्रकाराची सखोल चौकशी व्हावी, शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणे थांबवावे; अशा विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

'निर्माण' चळवळीचे प्रमुख अमृत बंग यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले. या देशव्यापी प्रश्नावर आपले मत मांडणे आणि सोनम वांगचूक यांच्या भूमिकेला बळ देणे हाच या आंदोलनाचा मुख्य उद्देश असल्याचे सहभागी विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT