Sonam Wangchuk | सोनम वांगचुक, तुम लडो, हम...

Sonam Wangchuk |
Sonam Wangchuk | सोनम वांगचुक, तुम लडो, हम...
Published on
Updated on

डॉ. सुकृत खांडेकर

शिक्षणतज्ज्ञ, पर्यावरणवादी कार्यकर्ते व लडाखला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळावा म्हणून आग्रही असलेले सोनम वांगचुक जंतर मंतरवर आमरण उषोषणसाठी बसले तेव्हा देशातील विरोधी पक्ष सैरभैर झाल्यासारखे दिसले. नीट परीक्षेच्या पेपरफुटीची नैतिक जबाबादारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी अभिजित दीपकेच्या नेतृत्वाखाली कॉक्रोच जनता पार्टीने गेले महिना-दोन महिने आंदोलन चालवले आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सोनम वांगचुक लडाखहून दिल्लीला जंतर मंतरवर आले व त्यांनी धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आमरण उपोषण सुरू केले.

गैरव्यवहार, घोटाळा, भ्रष्टाचार आदी मुद्द्यांवरून यापूर्वी विरोधी पक्षात असताना भारतीय जनता पक्षाने मंत्र्यांचे किंवा मुख्यमंत्र्यांचे राजीनामे मागण्यासाठी अनेक राज्यांत अनेकदा प्रखर आंदोलने केली आहेत. सत्तेचा गैरवापर, घोटाळा किंवा भ्रष्टाचाराचे आरोप झाले म्हणून काँग्रेस सत्तेवर असताना अनेक मंत्र्यांना व मुख्यमंत्र्यांना राजीनामे देणे भाग पडले होते. बॅरिस्टर ए. आर. अंतुले, शिवाजीराव निलंगेकर पाटील, सुधाकरराव नाईक, अशोक चव्हाण, विलासराव देशमुख अशा दिग्गजांना त्यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. नीट परीक्षेच्या पेपर फुटीबद्दल मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी आंदोलन करीत आहे व लडाखचे रॅमन मेगासेसे पुरस्कार विजेते दिल्लीत येऊन आमरण उपोषणाला बसतात, याला वेगळी किनार आहे. सरकारवर रोज आरोपांची राळ उडवणारे किंवा लोकशाहीचा गळा घोटला जातोय म्हणून सातत्याने आक्रोश करणारे विरोधी पक्ष पेपरफुटीच्या मुद्द्यावर दोन महिने शांत का होते? आंदोलन करू नये म्हणून कुणी त्यांचे हात बांधले होते? सोनम वांगचुक यांची आमरण उपोषणाने जेव्हा प्रकृती खालावली, वजन झपाट्याने कमी झाले, त्यानंतर राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष, अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष, उद्धव ठाकरेंची उबाठा सेना, अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष, ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष आता पुढे सरसावले व त्यांनी उपोषण सोडावे असे सांगू लागले. तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा, अभिनेता नसरूद्दीन शहा, रत्ना पाठक, लेखिका अरुंधती रॉय आदींनी सोनम वांगचुक यांना उपोषण सोडण्याची विनंती केली.

विरोधी पक्षांना अगोदरच पक्षफुटीच्या भीतीने ग्रासले आहे. पक्षाचे आमदार, खासदार कधीही सत्तेच्या दिशेने निघून जातील, हे भय सर्वच विरोधी पक्षांना आहे. त्यातच सोनम वांगचुक यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतर मंतरवर आमरण उपोषण सुरू केल्याने विरोधी पक्ष आणखी संभ्रमात पडले. उपोषणाला दोन आठवडे झाल्यानंतर विरोधी पक्षांचे नेते सोनम वांगचुक यांना पाठिंबा देऊ लागले. आम्ही तुमच्या बरोबर आहोत, असे सांगू लागले. 'तुम लडो, हम कपडे संभालते है' अशी अवस्था विरोधी पक्षांची दिसली. केंद्रात नरेंद्र मोदी सरकारवर किंवा राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारवर आरोप करणे सोपे आहे; पण सरकार विरोधात जनआंदोलन उभारण्याची ताकद आणि क्षमता विरोधी पक्षांत राहिलेली नाही. म्हणूनच कमजोर झालेले विरोधी पक्ष सोनम वांगचुक यांना 'तुम्ही लढा…' असे सांगत आहेत.

मे महिन्याच्या सुरुवातीला वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेचे पेपर फुटले व परीक्षा रद्द झाली. तेवीस लाख विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला. हजारो विद्यार्थ्यांना मानसिक त्रास झाला. दहा-बारा विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या. पेपर फुटीवरून महाराष्ट्रासह अन्य राज्यांतही डझनभर जणांना अटक झाली. त्यात काही प्राध्यापक व शिक्षकांचाही समावेश आहे. कोचिंग क्लासेसचे संचालकही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विरोधी पक्षाने या ज्वलंत प्रश्नावर अपेक्षेप्रमाणे रान उठवायला हवे होते; पण तुरळक मोर्चे व निषेधाची पत्रके या पलीकडे त्यांची मजल गेली नाही. सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाने कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला बळ मिळाले आहे. आंदोलनाच्या बातम्या, छायाचित्रे कुठेही वृत्तपत्रात फारशी प्रसिद्ध होत नाहीत. वृत्त वाहिन्यांवरून जंतर मंतरवरील आंदोलनाचे चित्रीकरण दाखवले जात नाही, तरीही सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाने सर्व देशाचे लक्ष्य वेधून घेतले.

उपोषणाने प्रकृती खालावत असतानाही मी शरीराने अशक्त वाटत असलो, तरी मनाने खंबीर आहे, तसेच मी सुरू केलेले काम शेवटापर्यंत नेणार आहे, असे ५९ वर्षांचे सोनम वांगचुक मीडियाशी बोलताना सांगत होते. लडाखमध्ये वांगचुक हे 'सोनम सर' म्हणून ओळखले जातात. मेकॅनिकल इंजिनिअरचे शिक्षण घेतलेल्या वांगचुक यांनी लडाखला हवामान बदलाच्या परिणामांशी सामना करताना अनेक उपाय सुचवले आहेत. लडाखमध्ये ते आदरणीय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. २०१८ मध्ये आशियातील सर्वात प्रतिष्ठित समजला जाणारा रॅमन मेगासेसे पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लडाखमध्ये जनआंदोलन भडकविण्याचा आरोप ठेवून त्यांना पोलिसांनी अटक केली. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या सोनम वांगचुक यांना अटक झाल्यावर तब्बल १७० दिवस जोधपूरच्या तुरुंगात काढावे लागले. त्यानंतर सरकारने आरोप मागे घेतले व वांगचुक यांची सुटका झाली. वांगचुक यांनी लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा म्हणून उपोषण केले असताना २४ सप्टेंबर २०२५ रोजी लडाखमध्ये मोठा हिंसाचार झाला. त्यात ४ जणांचा मृत्यू झाला व ९० जण जखमी झाले. त्यानंतर दोनच दिवसांनी २४ सप्टेंबर रोजी सरकारने वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली (एनएसए) अटक केली.

सोनम वांगचुक यांचा जन्म १ सप्टेंबर १९६६ रोजी जम्मू-काश्मीरमधील लेहमध्ये झाला. त्यांचे शालेय शिक्षण श्रीनगर येथे झाले. श्रीनगरमधूनच ते मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बी टेक झाले. नंतर फ्रान्समध्ये त्यांनी आर्किटेक्चरचा अभ्यासक्रम पूर्ण केला. दि. १५ मे २०२६ रोजी एका सुनावणीच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी सोशल मीडियावर सदैव सक्रिय असलेल्या बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी (कॉक्रोच) केली. त्याची संतप्त प्रतिक्रिया तरुणाईत उमटली व अभिजित दीपके यांच्या कल्पकेतून कॉक्रोच जनता पार्टीची निर्मिती झाली. दुसऱ्याच दिवशी दि. १६ मे रोजी त्यावेळी अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या अभिजित दीपकेने सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टीची घोषणा केली व देशातील कोट्यवधी तरुणांनी त्याला प्रतिसाद दिला. अभिजित दीपकेने दि. २२ मे रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी ऑनलाईन याचिका केली व त्याला आठ लाखांपेक्षा जास्त जणांचे समर्थन मिळाले. पेपरफुटी, परीक्षा रद्द होणे किंवा विलंबाने निकाल लागणे यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते म्हणून त्यांना दहा हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, सर्व मोठ्या परीक्षांच्या तारखा अगोदर निश्चित झाल्या पाहिजेत व दुबार परीक्षा ७२ तासांत झाली पाहिजे, विलंबाने परीक्षा होणार असेल, तर विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत सूट मिळावी अशा प्रमुख मागण्या अभिजितच्या पक्षाने केल्या आहेत; पण त्यावर कुठे खुली चर्चा होत नाही.

भाजपमध्ये मंत्र्यांच्या राजीनाम्याची प्रथा नाही, असे म्हटले जाते. गेल्या बारा वर्षांत विरोधी पक्षांनी भाजपच्या अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप केले; पण 'मी टू…' वादात आरोप झालेल्या एम. जे. अकबर वगळता मोदी सरकारमधील अन्य कोणत्याही मंत्र्याने राजीनामा दिलेला नाही. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, तर त्यांच्याकडून चूक झाली, असा संदेश जाऊ शकतो. म्हणूनच फेरबदलाच्या वेळी नको असलेले मंत्री हटवले जाऊ शकतात, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.

नीट परीक्षेचे पेपर भ्रष्टाचारामुळे व पैशाच्या मोहामुळे फुटले, हे वास्तव आता उघड झाले आहे. पेपरफुटीत लाखो-कोटी देवघेवीचे व्यवहार झाले. ही परीक्षा देणारे विद्यार्थी, त्यांचे पालक, जागरूक नागरिक कमालीचे अस्वस्थ आहेत. परीक्षा व्यवस्थापनाबद्दल त्यांच्या मनात राग आहे. सोनम वांगचुक त्यांच्या स्वत:च्या मागण्यांसाठी नव्हे, तर पेपरफुटीचे शिक्षण मंत्र्यांनी प्रायश्चित्त घ्यावे, यासाठी जंतर मंतरवर लढत आहेत. त्यांच्या आंदोलनावर राजकीय पक्ष संवेदनशील नाहीत, हीच विद्यार्थी व पालकांची मोठी खंत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news