विदर्भ

परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी करा : विभागीय आयुक्‍त प्राजक्ता लवंगारे-वर्मा

अनुराधा कोरवी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: दक्षिण आफ्रिकेमध्ये 'ओमिक्रॉन' हा कोविड विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त दिशानिर्देशांचे काटेकोरपणे पालन करून परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी नागपुरात दिल्या आहेत.

नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली. नागपूरच्या जिल्हाधिकारी विमला आर, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर याच्यासह पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, पोलीस उपायुक्त बसवराज तेली, महापालिकेचे अपर आयुक्त राम जोशी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर व कोविड टास्क फोर्सचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

कोविडच्या नवीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे असून मास्क, सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. तसेच संभाव्य तिसरी लाट विचारात घेवून पुरेशा प्रमाणात मेडिकल ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी, ऑक्सिजन निर्मिती प्लांट व मेडिकल ऑक्सिजन स्टोअरेज प्लांट उभारण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. कार्यान्वित करण्यात आलेले प्लांट, सिलेंडरमधील उपलब्ध ऑक्सिजन साठ्याची पुन्हा एकदा तपासणी करून संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सज्जता ठेवण्याच्या सूचना लवंगारे-वर्मा यांनी या बैठकीत दिल्या.

जास्तीत- जास्त व्यक्तींचे कोविड लसीकरण झाले तर आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण कमी होईल. त्यामुळे कोविडची लाट रोखण्यासाठी लसीकरणावर अधिक भर देणे गरजेचे आहे. प्रत्येक पात्र व्यक्तीला विहित कालावधीत दोन्ही डोस देण्याची कार्यवाही गतीने करावी. तसेच कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी, असे देखील लवंगारे-वर्मा म्हणाल्या.

तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाने येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना, गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे, भंडाराचे जिल्हाधिकारी संदीप कदम दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीमध्ये सहभागी झाले होते.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT