tiger attack  
चंद्रपूर

Heatwave impact on tiger | उष्णतेचा वाघांवर परिणाम; गुंजेवाही हल्ल्यामागे ‘थर्मल स्ट्रेस’चा इशारा

अतिउष्णतेमुळे वाघ अधिक आक्रमक होत असल्याचे निरीक्षण; डॉ. रविकांत खोब्रागडे यांचे महत्त्वपूर्ण विश्लेषण

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गुंजेवाही येथे चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असताना, या घटनेकडे केवळ ‘नरभक्षक वाघ’ म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही, असा महत्त्वपूर्ण इशारा वन्यजीव तज्ज्ञांनी दिला आहे. वाढत्या तापमानामुळे वाघांच्या वर्तनात बदल होत असून ‘थर्मल स्ट्रेस’मुळे त्यांची आक्रमकता वाढत असल्याचे निरीक्षण ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी तथा जलद बचाव गट प्रमुख डॉ. रविकांत एस. खोब्रागडे यांनी नोंदवले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाने ४५ ते ४७ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. विदर्भातील उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे सामान्य नागरिक हैराण झाले असतानाच जंगलातील वन्यजीवांवरही त्याचा गंभीर परिणाम होत आहे. विशेषतः वाघासारख्या मोठ्या मांसाहारी प्राण्यांमध्ये उष्णतेमुळे निर्माण होणारा ‘थर्मल स्ट्रेस’ त्यांच्या नैसर्गिक वर्तनावर परिणाम करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

डॉ. खोब्रागडे यांच्या मते, अतिउष्णतेच्या परिस्थितीत वाघ अधिक चिडचिडे, अस्वस्थ आणि संवेदनशील बनतात. जंगलातील पाणवठे आटणे, सावलीच्या जागा कमी होणे आणि अधिवासातील तापमान वाढणे यामुळे वाघांच्या हालचालींमध्ये मोठे बदल होतात. थंडावा आणि पाण्याच्या शोधात हे प्राणी मानवी वस्तीकडे वळण्याची शक्यता वाढते. परिणामी मानव-वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र स्वरूप धारण करतो.

गुंजेवाही येथील घटनेतही अशाच प्रकारचा ‘थर्मल स्ट्रेस’ कारणीभूत असू शकतो, असे प्राथमिक निरीक्षण डॉ. खोब्रागडे यांनी व्यक्त केले आहे. तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या महिलांवर वाघाने अचानक हल्ला केल्याने चार महिलांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, जंगलातील नैसर्गिक संसाधनांवर वाढता ताण, पाण्याची टंचाई, मानवी हस्तक्षेप आणि हवामान बदल यामुळे वन्यजीवांचे पारंपरिक वर्तन बदलत आहे. चंद्रपूरसारख्या व्याघ्रबहुल जिल्ह्यात ही परिस्थिती अधिक गंभीर बनत असून उन्हाळ्यात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

डॉ. खोब्रागडे यांनी जंगलालगतच्या गावांमध्ये जनजागृती वाढविणे, पाणवठ्यांचे व्यवस्थापन मजबूत करणे, उन्हाळ्यात जंगलात जाण्यावर मर्यादा आणणे आणि वनविभागाच्या सतर्क यंत्रणेला अधिक सक्षम करणे तसेच वन्यजीवांच्या वर्तनातील बदलांचा वैज्ञानिक अभ्यास करून दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT