Vijay Wadettiwar | “चार महिलांचा मृत्यू ही दुर्घटना नाही, तर सरकारी आणि वन विभागाच्या अनास्थेने घेतलेले बळी” : विजय वडेट्टीवार

“गरीबांच्या जीवाची किंमत शून्य झाली का?” सोशल मीडियातून सरकारला सवाल; मानव-वन्यजीव संघर्षावर ठोस धोरणाची मागणी
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar Pudhari
Published on
Updated on

Chandrapur Tiger Attack

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांचा वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार  हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी या घटनेला “निव्वळ दुर्घटना नसून सरकारी आणि वन विभागाच्या अनास्थेने घेतलेले बळी” असे संबोधत राज्य सरकार आणि वन विभागावर गंभीर आरोप केले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी सरकारवर जोरदार टीका करत मानव-वन्यजीव संघर्षावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या चार निष्पाप भगिनींचा वाघिणीच्या हल्ल्यात झालेला मृत्यू ही निव्वळ दुर्घटना नाही, तर तो प्रशासकीय अनास्थेने केलेला घात आहे. हे सरकार नक्की झोपलंय कुठे?”

Vijay Wadettiwar
Chandrapur Tiger Attack | वरवट येथे तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या महिलांवर वाघाचा हल्ला; महिला गंभीर जखमी, जिल्ह्यात दुसरी घटना

ग्रामीण भागातील गरीब आणि कष्टकरी जनता उदरनिर्वाहासाठी जंगलावर अवलंबून असल्याचे सांगत त्यांनी सरकारला सवाल केला की, “जंगलात जाणाऱ्या नागरिकांना सुरक्षा देणे हे वन विभाग आणि सरकारचे कर्तव्य नाही का? वाघ-मानव संघर्ष काही नवीन नाही. रोज कुठे ना कुठे हल्ले होत आहेत, निष्पाप गरीबांचे बळी जात आहेत, पण सरकार आणि वन विभाग अजूनही कुंभकर्णासारखे झोपेत आहेत.”

वन विभागाच्या कार्यपद्धतीवर टीका करत त्यांनी विचारले की, “जंगलावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने नेमकी कोणती ठोस पावले उचलली? ॲक्शन प्लॅन कुठे आहे? अधिकारी फक्त वातानुकूलित केबिनमध्ये बसून बैठका घेणार की प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करणार?”

Vijay Wadettiwar
Chandrapur Tiger Attack: चंद्रपूर हादरले! सिंदेवाहीत वाघाचा काळजाचा थरकाप उडवणारा हल्ला, ४ महिलांचा मृत्यू

वडेट्टीवार यांनी प्रशासनाच्या भूमिकेवरही संताप व्यक्त करत म्हटले की, “जर एखादा वाघ मारला गेला तर तात्काळ चौकशी समित्या बसवल्या जातात. मात्र एकाच वेळी चार गरीब महिलांचे बळी जातात तेव्हा प्रशासन एवढं सुस्त कसं राहू शकतं? कष्टकऱ्यांच्या जिवाची किंमत शून्य झाली का?”

सिंदेवाही परिसरात आज शुक्रवारी घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. गुंजेवाही येथील महिला तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेल्या असताना वाघिणीने त्यांच्यावर हल्ला केला. या भीषण घटनेत चार महिलांचा मृत्यू झाला. घटनेनंतर वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून संबंधित वाघिणीचा शोध सुरू आहे.

Vijay Wadettiwar
Tiger Attack Chandrapur | मोहफुल वेचण्यासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

विशेष म्हणजे, मागील वर्षी 10 मे 2025 रोजी सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव उपक्षेत्रातील मेंढामाळ परिसरातही तेंडूपत्ता संकलनासाठी गेलेल्या तीन महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. आता जवळपास त्याच कालावधीत पुन्हा अशीच घटना घडल्याने वन विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत वाघांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून मानव-वन्यजीव संघर्ष गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने ठोस धोरण जाहीर करावे, जंगलालगतच्या गावांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवावी आणि मृतांच्या कुटुंबीयांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news