Heatwave | उष्णतेच्या लाटांचा सामना

Heatwave |
Heatwave | उष्णतेच्या लाटांचा सामना
Published on
Updated on

के. जे. रमेश, माजी संचालक, भारतीय हवामान विभाग

दरवर्षी उन्हाचा कडाका नवनवे विक्रम मोडत आहे. विशेषतः 2000 नंतर ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे दरवर्षी अधिक उष्णतेची जाणीव होऊ लागली आहे. भूजलाचा अतिवापर या तापमानात अधिकच भर घालत आहे. आपण जमिनीतून पाणी उपसतो आणि ती जागा रिकामी होते, तेव्हा ती जमीन तुलनेने अधिक तापू लागते. उद्यानांची कमतरता हेदेखील उष्णता वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे.

एप्रिल महिन्यातच आभाळातून जणू आगीच्या ज्वाळा बरसत आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि आसपासच्या परिसरात तापमानाचा पारा सातत्याने चढताच आहे. इतकेच नव्हे, तर रात्रीच्या वेळीही उष्णतेने नवे विक्रम प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे. हवामान विभागाने अनेक भागांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे; मात्र ईशान्य भारत आणि त्याला लागून असलेल्या प्रांतांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या विरोधाभासाचे नेमके कारण काय? वास्तविक, निसर्ग स्वत:चे उपचार स्वतःच करत असतो. उन्हाळ्यात जेव्हा तापमान वाढते, तेव्हा एका ठरावीक पातळीवर पोहोचल्यानंतर त्यात घट होणे अनिवार्य असते. या प्रक्रियेत आर्द्रता आणि बाष्पाची साथ मिळाली, तर वादळी पाऊस पडतो आणि ही साथ मिळाली नाही, तर धुळीची वादळे येऊन वातावरण काही प्रमाणात थंड करतात. आता कोणत्या भागात वादळ येईल आणि कुठे पाऊस पडेल, हे स्थानिक घटकांवर अवलंबून असते. तापमान संतुलित राखण्याचे हे एक नैसर्गिक चक्र आहे.

सध्या पाऊस पडण्याचे कारण म्हणजे, एकामागून एक येणारे ‘पश्चिमी विक्षोभ’ (वेस्टर्न डिस्टर्बन्स) हे आहे. याच कारणामुळे गेल्या काही दिवसांत जम्मू-काश्मीरचे काही भाग, उत्तराखंड आणि अगदी नेपाळपर्यंत हिमवृष्टी झाली आहे. येथील बदलत्या हवामानाचा प्रभाव उत्तर-पश्चिम क्षेत्रांवर पडतो, ज्यामध्ये पंजाब, हरियाणा, दिल्लीच नव्हे, तर पाकिस्तानच्या काही भागांचाही समावेश आहे. भारताच्या पूर्व भागाचा विचार केला, तर या दिवसांत आंध्र प्रदेशच्या उत्तर भागापासून ओडिशा, बिहार, बंगाल, झारखंड आणि सिक्कीमपर्यंत पाऊस होतो. कारण, बंगालच्या उपसागरातून या भागाला आर्द्रता मिळते. पश्चिमी विक्षोभ पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकत असल्याने देशाच्या या भागांत पावसाची हजेरी लागते.

मात्र, जूनमध्ये जेव्हा मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकेल, तेव्हा पुन्हा एकदा देशभर पावसाला सुरुवात होईल; पण यंदा मान्सून कमकुवत राहण्याचा आणि 92 टक्के पाऊस पडण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. मे महिन्याच्या अखेरीस हवामानाचे पुन्हा एकदा आकलन केले जाईल आणि त्यानंतर मान्सूनचे मासिक अंदाज जाहीर होतील. याशिवाय ‘इंडियन ओशन डायपोल’ची देखील चर्चा होत आहे, जे प्रत्यक्षात हिंदी महासागराच्या पश्चिम आणि पूर्व भागातील तापमानातील तफावत असते. हे सकारात्मक राहिल्यास भारतात चांगला मान्सून होतो, तर नकारात्मक असल्यास पाऊस कमी होतो. अलीकडच्या वर्षांत पावसाचे प्रमाण वाढण्याचे एक कारण हवामान बदल हेदेखील आहे. आता बिकानेर, बाडमेर, जोधपूरसारख्या भागांतही पूर येऊ लागला आहे. कारण, तिथे पावसाचे स्वरूप बदलले आहे. मग, तिथे ‘एल निनो’चा प्रभाव असो वा नसो.

हवामान बदलामुळे गेल्या काही वर्षांमध्ये उष्णता पूर्वीच्या तुलनेत लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. दरवर्षी उन्हाचा कडाका नवनवे विक्रम मोडत आहे. विशेषतः 2000 नंतर ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे दरवर्षी अधिक उष्णतेची जाणीव होऊ लागली आहे. भूजलाचा अतिवापर या तापमानात अधिकच भर घालत आहे, ही बाब अनेकांना माहीत नसते; पण आपण जमिनीतून पाणी उपसतो आणि ती जागा रिकामी होते, तेव्हा ती जमीन तुलनेने अधिक तापू लागते. त्याचप्रमाणे जमिनीचा वापर बदलून केली जाणारी विकासकामेही तापमान वाढवतात. विकासासाठी ज्या प्रमाणात झाडे तोडली जातात, त्या प्रमाणात ती लावली जात नाहीत, हे वास्तव आहे. त्यामुळे विकासकामे झालेल्या क्षेत्रांत उष्णता अधिक काळ टिकून राहते. उद्यानांची कमतरता हेदेखील उष्णता वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे. देशाची राजधानी दिल्लीचे उदाहरण घेतल्यास नेहरू प्लेस आणि धौलाकुआं या भागातील तापमानात सुमारे दोन अंशांचा फरक आढळतो. यावरून तापमानवाढीसंदर्भात उद्यानांचे महत्त्व लक्षात येते.

मानवी हस्तक्षेपही तापमानवाढीस मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे. वातानुकूलित यंत्रणेचे (एसी) साधे उदाहरण घ्या. आता प्रत्येक घरात याचा वापर होऊ लागला आहे; परंतु एसी मशिन खोली थंड करण्यासाठी बाहेर मोठ्या प्रमाणावर गरम हवा सोडतात. आपल्या जीवनशैलीत झालेला हा बदल आता आपल्यावरच उलटू लागला आहे. अशा स्थितीत सामान्य माणसाने काहीच करू नये का? ‘ग्लोबल वॉर्मिंग’शी लढण्यासाठी जागतिक स्तरावर धोरणे आखली जात आहेत आणि प्रत्येक सरकार आपल्या स्तरावर त्यांची अंमलबजावणी करत आहे; परंतु सामान्य माणसानेही स्वतःहून प्रयत्न केले, तर परिस्थिती काही प्रमाणात सुधारू शकते. उदाहरणार्थ, एस्बेस्टोस किंवा पत्रा शेडची घरे बांधणे टाळावे. महानगरांमधील झोपडपट्ट्यांमध्ये सामान्यतः यांचाच वापर केला जातो; परंतु अशी घरे उष्णता शोषून घेतात. सिमेंट-काँक्रीटच्या छतांवरही ‘रिफ्लेक्टिव्ह पेंट’चा वापर करावा, ज्यामुळे किमान दीड अंशांपर्यंत थंडावा मिळू शकतो. इतकेच नव्हे, तर घरांमध्ये पावसाच्या पाणी साठवणुकीची (रेन वॉटर हार्वेस्टिंग) विशेष व्यवस्था असायला हवी. यासाठी छतावरील पाणी पाईपद्वारे जमिनीत जिरवणे पुरेसे असते. भूजल पातळी टिकवून ठेवण्यासाठी ही पद्धत अत्यंत गुणकारी आहे; परंतु अद्याप ती आपल्या सवयीचा भाग बनलेली नाही. पावसाच्या पाण्याचा एक थेंबही नाल्यात वाहून जाऊ न देणे ही आपली जबाबदारी आहे.

अशाप्रकारचे प्रयत्न विशेषतः ग्रामीण उपजीविकेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. 38 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान मानवांसाठी ‘उष्माघात’ (हीटवेव्ह) ठरू शकते, तर जनावरांसाठी ही मर्यादा 28 अंश सेल्सिअस इतकीच आहे. आपली गुरे उन्हाने त्रस्त झाली, तर त्यांच्या खाण्यापिण्यावर परिणाम होतो, पर्यायाने दूध किंवा अंडी उत्पादनात घट होऊ शकते. यामुळे आधीच संकटात असलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर अधिक ताण वाढू शकतो. दुर्दैवाने या विषयावर फारशी चर्चा होत नाही; मात्र कृषी हवामानशास्त्र सेवेच्या मदतीने आपण याचे व्यवस्थापन सहज करू शकतो. येत्या दहा दिवसांत तामिळनाडूपासून बंगालपर्यंतच्या पूर्व भागात उष्णतेपासून थोडा दिलासा मिळू शकतो; मात्र उत्तर कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान आणि उत्तर प्रदेशसारख्या भागांत पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव ओसरताच उष्णता पुन्हा त्रास देऊ लागेल. आपण याच परिस्थितीनुसार स्वतःची तयारी करणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news