चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : दक्षिण ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील आवळगाव उपक्षेत्रात रविवारी (दि.५) सायंकाळच्या सुमारास वनविभागाने बेशुद्ध करून वाघिणीला जेरबंद केले, तर आज सोमवारी (दि.६) सकाळी आठच्या सुमारास त्याच भागातून नर वाघलाही जेरबंद करण्यात वनखात्याला यश आले आहे. बऱ्याच दिवसांपासून बरेच दिवसांपासून या दोन्ही वाघांची परिसरात दहशत होती. या वाघांना जेरबंद केल्याने स्थानिक गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास घेतला आहे.
हळदा शेतशिवारात काम करण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर बुधवारी वाघाने हल्ला करून तिला जागीच ठार केले. त्यानंतरही या परिसरात पाळीव जनावरांवर वाघांचे हल्ले सुरूच होते. त्यामुळे परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली होती. त्यानंतर वनविभागाने या परिसरात कॅमेरे लावून या वाघांवर पाळत ठेवली.त्यानंतर नर व मादी असे दोन वाघांची जोडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर काल रविवारी (दि.५) सांयकाळी वाघिणीच्या स्थळाची माहिती मिळताच हळदा नियतक्षेत्रात वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले. यावेळी
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) डॉ. आर. एस. खोब्रागडे, पोलीस नाईक (शूटर) अरुण मराठे, वन परिक्षेत्राधिकारी आर.डी. शेंडे, जीवशास्त्रज्ञ राकेश आहुजा व ब्रम्हपुरी वनविभाग पथकाने या वाघिणीला बेशुद्ध करून पकडले.
त्यानंतर आज सोमवारी (दि.६) सकाळी साडेआठच्या सुमारास याच परिसरातून एक नर वाघालाही बेशुध्द करून वनविभागाने पकडले. महिलेवर झालेला हल्ला व पाळीव प्राण्यांवर होत असलेले हल्ल्यांमुळे वनविभागाने ही कारवाई केली. यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. या दोन्ही वाघांची रवानगी चंद्रपूर येथील टीटीसी केंद्रात करण्यात आली आहे.
हेही वाचा :