रोशन कुडे (Pudhari Photo)
चंद्रपूर

Chandrapur Farmer News | सावकारी फासात अडकला बळीराजा : सावकाराने शेतकऱ्याला कंबोडियात विकायला लावली किडनी, चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथुर गावातील धक्कादायक वास्तव

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Farmer kidney selling case

चंद्रपूर : शेती आणि दुग्ध व्यवसायाच्या अपयशानंतर सावकारी कर्जाच्या फासात अडकलेल्या एका शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी थेट स्वतःची किडनी विकण्यास भाग पाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथुर गावात उघडकीस आला आहे. नागभीड तालुक्यातील मिंथुर गावातील शेतकरी रोशन सदाशिव कुडे यांनी सावकारी जाचामुळे आयुष्यभराचा आक्रोश व्यक्त करत प्रशासनासमोर गंभीर आरोप केले आहेत. कर्जाच्या विळख्यातून सुटका न झाल्याने त्यांनी मंत्रालयासमोर कुटुंबासह आत्मदहनाचा इशाराही दिला आहे.

एक लाखांचे कर्ज, व्याजाने ७४ लाखांचा डोंगर

रोशन कुडे यांच्याकडे चार एकर शेती असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी दुग्ध व्यवसायही सुरू केला होता. मात्र निसर्गाच्या अवकृपेने व आर्थिक अडचणींमुळे हा व्यवसाय अपयशी ठरला. या काळात घेतलेल्या एक लाख रुपयांच्या सावकारी कर्जावर अव्वाच्या सव्वा व्याज लावण्यात आले. काळाच्या ओघात हे कर्ज वाढत जाऊन तब्बल ७४ लाख रुपयांपर्यंत पोहोचले, असा आरोप कुडे यांनी केला आहे.

जमीन, ट्रॅक्टर, घरातील साहित्य विकूनही सुटका नाही

कर्ज फेडण्यासाठी कुडे यांनी आपल्या आयुष्यातील सर्व काही पणाला लावले. शेतीची जमीन, ट्रॅक्टर तसेच घरातील मौल्यवान साहित्य विकूनही कर्जाचा डोंगर कमी झाला नाही. उलट सावकाराकडून सतत मानसिक छळ, धमक्या आणि दबाव वाढत गेला. कुटुंबाच्या भवितव्यापुढे हतबल झालेल्या कुडे यांना अखेर अमानुष पर्याय स्वीकारावा लागला.

सावकाराच्या सल्ल्याने कंबोडियात किडनी विक्री

कर्जातून सुटका करण्याचा ‘उपाय’ म्हणून सावकारानेच किडनी विकण्याचा सल्ला दिल्याचा गंभीर आरोप कुडे यांनी केला आहे. एका एजंटमार्फत त्यांना कंबोडियात नेण्यात आले, जिथे त्यांनी स्वतःची किडनी विकली. या बदल्यात त्यांना आठ लाख रुपये मिळाले. मात्र हा पैसा कर्जाच्या तुलनेत तुटपुंजा ठरला आणि त्यांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम झाला.

पोलिसांकडे तक्रार; कारवाई शून्य

या संपूर्ण प्रकरणाबाबत कुडे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अखेर न्याय मिळत नसल्याने आणि सावकारी जाच थांबत नसल्याने त्यांनी अखेर टोकाची भूमिका घेतली आहे. त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन सावकारांकडून होत असलेला जात त्यांनी त्याद्वारे मांडला आणि न्यायाची अपेक्षा केली तसेच राज्य शासनाला ही त्यांनी न्यायासाठी साकडे घातले आहे.

मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा

न्यायासाठी शेवटचा मार्ग म्हणून रोशन कुडे यांनी कुटुंबासह मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे. या घटनेमुळे राज्यातील सावकारीविरोधी कायद्यांची अंमलबजावणी, शेतकऱ्यांची आर्थिक सुरक्षितता आणि प्रशासनाची संवेदनशीलता यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

ही घटना केवळ एका शेतकऱ्याची नाही, तर महाराष्ट्रातील असंख्य बळीराजांच्या वेदनेचे भयावह चित्र दर्शवित आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT