

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात वाघ–मानव संघर्षाच्या घटनांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली असून, दोन वेगवेगळ्या तालुक्यांत वाघाच्या हल्ल्यात दोन निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सिंदेवाही तालुक्यात शेतात काम करणाऱ्या महिलेचा, तर मुल तालुक्यात जंगलात गुरे चारायला गेलेल्या गुराख्याचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला. या सलग घटनांमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सिंदेवाही तालुक्यातील पवना चक (गुंजेवाही) गावातील अरुणा अरुण राऊत (वय ४५) या काल शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास शेतात कापूस वेचण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी पावणापार बिट, कंपार्टमेंट क्रमांक १४१३ जवळ अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जंगलात ओढून नेले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी व रॅपिड रिस्पॉन्स युनिट घटनास्थळी दाखल झाले. RFO अंजली सायनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
दुसरी घटना आज रविवारी मुल तालुक्यातील मोजा बेलघाटा येथील पितांबर गुलाब सोयाम (वय ३७) यांच्याबाबत घडली. पितांबर हे शनिवारी दुपारी गुरे चराईसाठी जंगलात गेले होते. सायंकाळ होऊनही ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला व वनविभागाला माहिती दिली. रविवारी गावकरी व वनविभागाच्या पथकाने संयुक्त शोधमोहीम राबवली असता, कन्हाळगाव बिट, कक्ष क्रमांक १७६५ येथे वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले.
वनविभागाने घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, मुल येथे शवविच्छेदनासाठी पाठविला. सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे व सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबीयांना तात्काळ ४० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.
या दोन्ही घटनांमुळे बेलघाटा, सिंदेवाही व आसपासच्या परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, वनविभागाने नागरिकांना जंगलालगतच्या भागात, तसेच गुरे चराईसाठी जाताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.