Chandrapur MLC Election
चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली असून, काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. नामांकन मागे घेण्याच्या अंतिम दिवशी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन अर्ज मागे घेतला. त्यानंतर अपक्ष उमेदवार सुधीर कोठारी यांनीही माघार घेतल्याने महायुतीचे उमेदवार अरुण लाखानी यांच्या अविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही उमेदवारांनी माघार घेतल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक विभागाला कळविली असून लाखानी हे अविरोध निवडून आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शैलेश अग्रवाल यांनी निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, मतदारसंघातील संख्याबळाचा विचार करता विजयाची शक्यता कमी असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी अखेर माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे, हा निर्णय घेताना त्यांनी स्थानिक काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांना कोणतीही पूर्वकल्पना दिली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पक्षांतर्गत मोठी खळबळ उडाली असून कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अर्ज मागे घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अग्रवाल यांनी संख्याबळ अपुरे असल्याने निवडणुकीतून माघार घेत असल्याचे स्पष्ट केले. या निर्णयाबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला माहिती दिली असल्याचाही दावा त्यांनी केला.
यावेळी त्यांनी काँग्रेसमधील काही नेत्यांवर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. भाजपच्या काही नेत्यांशी संगनमत करून काँग्रेसमधील काही लोक मतदारांमध्ये पैशांचे वाटप करत असल्याचा आरोप शैलेश अग्रवाल यांनी केला. या आरोपांमुळे जिल्ह्यातील राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, या आरोपांबाबत संबंधितांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
दरम्यान, अपक्ष उमेदवार सुधीर कोठारी यांनीही आपला अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीच्या मैदानात अरुण लाखानी हे एकमेव उमेदवार उरले. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाल्याचे मानले जात होते. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून निवडणूक विभागाला याबाबतची माहिती पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने लाखानी यांची अविरोध निवड झाल्याचे निवडणूक विभागाला कळविण्यात आले आहे.
राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतल्याने पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दुसरीकडे, महायुतीसाठी हा मोठा राजकीय विजय मानला जात असून अरुण लाखानी यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड ही महायुतीच्या राजकीय वर्चस्वाची नोंद म्हणून पाहिली जात आहे. चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावर या निकालाचा प्रभाव पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.