

विशेष प्रतिनिधी
नांदेड ः विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपामध्ये नांदेडच्या जागेवरून तिढा नव्हता; पण इतर काही जागांवरून चर्चेचे गुऱ्हाळ लांबत गेल्यामुळे भाजपाला नांदेडसह इतर जागांवरील आपले उमेदवार शुक्रवारपर्यंत जाहीर करता आले नाहीत. असे असले, तरी नांदेडमधून भाजपातर्फे माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांचे नाव जवळपास फायनल झाले आहे.
राजूरकर हे खा. अशोक चव्हाण यांचे निकटवर्ती असून भाजपाचे महानगराध्यक्ष या नात्याने त्यांनी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही चांगली छाप पाडली आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी गाजावाजा किंवा प्रसिद्धी न करता शहा यांची दिल्लीमध्ये भेटही घेतली होती. या निवडणुकीतील पूर्वानुभव तसेच विरोधी पक्षांमधील अनेक मते खेचण्याची त्यांची क्षमता आणि सिद्धता पाहता या मतदारसंघात विजयाची हॅट्ट्रिक करण्याची त्यांना संधी आहे.
2010 साली या मतदारसंघात राजूरकरांची काँग्रेसतर्फे बिनविरोध निवड झाली. 2016 साली त्यांनी भाजपा पुरस्कृत सशक्त लॉबीच्या उमेदवारालाही पराभूत केले होते. भाजपामध्ये आल्यानंतर या पक्षातर्फे त्यांना आतापर्यंत संधी मिळाली नाही. पण त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून या पक्षातर्फे निवडणूक लढविण्याचे त्यांचे लक्ष्य जवळपास आवाक्यात आले आहे. त्यांचा अर्ज व त्यासोबत दाखल करावी लागणारी कागदपत्रे तयार असून त्यांचा अर्ज सोमवारी दाखल केला जाणार आहे.
या अत्यंत खर्चिक आणि मतदारांना दोन आठवडे जपावे लागणाऱ्या निवडणुकीत भाजपाच्या विरोधात एक उमेदवार उभा करण्यासंदर्भात चर्चा, बैठका, खलबतं झाल्याचे मागील चार-पाच दिवसांत दिसले; पण भाजपाच्या बलाढ्य यंत्रणेला खंबीरपणे तोंड देऊ शकणाऱ्या सक्षम उमेदवाराचे नाव आतापर्यंत समोर आलेले नाही. भाजपा व या पक्षाचे स्थानिक नेते खा.अशोक चव्हाण यांच्यावर दबाव आणण्याच्या दृष्टीने काही घडामोडी झाल्या असल्या, तरी महाविकास आघाडीसह खा.चव्हाण यांच्या विरोधात असलेल्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडेही भाजपाच्या विरोधात तोलामोलाचा उमेदवार नसल्याचे दिसत आहे.
शिवसेना (उबाठा) पक्षाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा तसेच आ.प्रताप पाटील चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण यांनी नामनिर्देशनपत्र दाखल करत आपल्याकडे लक्ष वेधून घेतले; पण माघारीची मुदत संपल्यानंतर त्यांचे अर्ज कायम राहणार का, यावर या निवडणुकीतील रंगत अवलंबून आहे.
महाविकास आघाडीनेही ही निवडणूक लढविण्याची घोषणा केली असली, तरी या आघाडीकडून अद्याप एकाही सक्षम उमेदवाराचे नाव समोर आलेले नाही. आघाडीत थोरला असलेल्या काँग्रेस पक्षाचे खासदार रवींद्र चव्हाण हे तर कालपर्यंत कौटुंबिक सहलीवर होते.
या निवडणुकीच्या संबंधाने राजकीय घडामोडींना रविवारनंतर गती येईल, असा अंदाज आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची शेवटची मुदत सोमवारी दुपारी 3 पर्यंत आहे, तर 4 जून ही माघारीची अंतिम तारीख आहे. या मतदारसंघात भाजपाला गेल्या 40 वर्षांत कधीही वाव मिळाला नव्हता; पण आता हा पक्ष आपल्या हक्काच्या मतदारांसह इतर काही मित्रपक्षांच्या मतांच्या बळावर अव्वलस्थानी असल्याचे दिसते.
विधान परिषद निवडणूक पक्षीय बलाबल
येत्या 18 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी नांदेड महापालिका, जिल्ह्यातील नगर परिषदा व नगरपंचायतमधील मतदारांची एकूण सदस्य संख्या 446 आहे. यात भाजपा -138, राष्ट्रवादी काँग्रेस -82, शिवसेना -23, काँग्रेस 92, शिवसेना उबाठा -19, वंचित बहुजन आघाडी -06, मराठवाडा जनता पार्टी -39, एमआयएम 20, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार -13 आणि अपक्ष -14 असे पक्षीय बलाबल आहे. यामध्ये स्वीकृत सदस्यांचाही समावेश आहे.