Rajura Taluka Pandan Road Condition
चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील धी डशी ते पेलोरा या मार्गावरील सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या पांदण रस्त्याची अवस्था अत्यंत भयावह झाली आहे. या रस्त्यामुळे शेतकऱ्यांसह त्यांच्या जनावरांनाही अक्षरशः मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. पावसाळ्यात संपूर्ण रस्ता चिखलात गडप होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी जाणेही कठीण झाले आहे. विशेष म्हणजे अद्याप या रस्त्याचे साधे मातीकामही झालेले नसून खडीकरण व मुरूम टाकण्याचा प्रश्न तर दूरच आहे.
या तीन किलोमीटरच्या पांदण रस्त्यावर परिसरातील सुमारे २५ ते ३० शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती आहे. शेतीच्या हंगामात खत, बी-बियाणे, औषधे आणि अन्य शेती साहित्य शेतात पोहोचविण्यासाठी याच रस्त्याचा आधार घ्यावा लागतो. मात्र पावसाळ्यात रस्त्याची अवस्था इतकी बिकट होते की, गुडघाभर चिखलातून माणसांना चालणेही अवघड होते. बैलगाडी किंवा इतर साधनांनी शेती साहित्य नेणे जवळपास अशक्य झाले आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेचे विदारक चित्र नुकतेच एका घटनेतून समोर आले. एका शेतकऱ्याने बैलगाडीने शेतीसाठी खत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र चिखल आणि खड्ड्यांमुळे बैलजोडीला पुढे जाता आले नाही. रस्त्याच्या मधोमधच बैलजोडी चिखलात फसून बसली. अखेर दुसरा बैल आणून बैलबंडी बाहेर काढावी लागली. या घटनेमुळे पांदण रस्त्याची प्रत्यक्ष परिस्थिती किती गंभीर आहे, हे स्पष्ट झाले आहे. याच घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे, चिखल आणि दलदलीची परिस्थिती निर्माण झाल्याने जनावरांना मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकदा चिखलात पाय फसल्याने जनावरे खाली बसतात. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर शेतीच्या कामासोबतच जनावरांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पावसाळ्यात या रस्त्याने जाणे शक्य नसल्याने अनेक शेतकरी उन्हाळ्यातच खत, बी-बियाणे आणि इतर आवश्यक साहित्य शेतात नेऊन ठेवतात. मात्र प्रत्येक शेतकऱ्याला ही व्यवस्था करणे शक्य नसल्याने शेतीचा हंगाम सुरू झाल्यानंतर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेती करणेच नाकीनऊ आले असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.
एकीकडे शासनाकडून पांदण रस्त्यांच्या विकासासाठी विविध योजना आणि मोठ्या घोषणा केल्या जात आहेत. मात्र दुसरीकडे राजुरा तालुक्यातील या तीन किलोमीटरच्या रस्त्याला अद्याप मूलभूत सुविधाही मिळालेल्या नाहीत. त्यामुळे शासनाच्या प्रस्तावित पांदण रस्ता योजनेत या मार्गाचा समावेश होणार का आणि शेतकरी व जनावरांची या मरणयातनेतून सुटका होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शेतकरी सुनील कोरडे म्हणाले, “आम्हाला या पांदण रस्त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पावसाळ्यामध्ये या रस्त्याने जाणे शक्य होत नाही. माणूस आणि जनावरे गुडघाभर चिखलात फसतात. शेतीचे साहित्य शेतात नेता येत नाही. त्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. शासनाने या रस्त्याची दुरवस्था लक्षात घेऊन तातडीने मातीकाम आणि खडीकरण करावे. शेतकरी व जनावरांना होत असलेल्या त्रासातून दिलासा मिळावा, हीच अपेक्षा आहे.”
सामाजिक कार्यकर्ते उमाकांत धांडे म्हणाले, “सरकार समृद्धी महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग यांसारखे मोठे रस्ते निर्माण करण्यासाठी पुढाकार घेत आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक पांदण रस्त्यांची अवस्था आजही अत्यंत बिकट आहे. या रस्त्यांवरून जाताना शेतकऱ्यांसह जनावरांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासन आणि प्रशासनाने ग्रामीण भागातील अशा रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने कामे हाती घ्यावीत. पांदण रस्त्यांचे मातीकाम, खडीकरण व मुरूमीकरण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.”
पांदण रस्ता हा शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पोहोचण्याचा प्रमुख मार्ग असल्याने त्याची दुरुस्ती ही केवळ रस्त्याची समस्या नसून शेतकऱ्यांच्या शेतीशी आणि त्यांच्या उदरनिर्वाहाशी निगडित बाब आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या तीन किलोमीटर रस्त्याची तातडीने पाहणी करून मातीकाम, खडीकरण आणि मुरूमीकरणाचे काम हाती घ्यावे, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.