Chandrapur News | सहा महिन्यांपासून जन्म-मृत्यू नोंदणी विभाग वाऱ्यावर! पंचायत समिती नागभीड येथील प्रकार

पूर्णवेळ कर्मचारी नसल्याने नागरिकांची ससेहोलपट-  चंद्रपूर-नागपूरहून येणाऱ्यांचाही वारंवार फेऱ्या
Chandrapur News | सहा महिन्यांपासून जन्म-मृत्यू नोंदणी विभाग वाऱ्यावर! पंचायत समिती नागभीड येथील प्रकार
Published on
Updated on

चंद्रपूर :  पंचायत समिती नागभीड येथील जन्म-मृत्यू नोंदणी विभाग गेल्या सहा महिन्यांपासून पूर्णवेळ कर्मचाऱ्याविना सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जन्म व मृत्यू दाखले मिळविण्यासाठी नागरिकांना दिवसभर कार्यालयात ताटकळत राहावे लागत असून, अनेकांना काम न होताच पुन्हा परतावे लागत आहे. त्यामुळे या विभागात तत्काळ पूर्णवेळ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सहा महिन्यांपूर्वी पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील दोन कर्मचारी निवृत्त झाले. मात्र, त्यांच्या रिक्त जागांवर अद्याप कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आलेली नाही. सध्या तळोधी बाळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका आरोग्य सहाय्यकाकडे जन्म-मृत्यू नोंदणी विभागाचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला आहे. संबंधित कर्मचारी आठवड्यातील केवळ सोमवार आणि गुरुवार या दोन दिवशी पंचायत समितीत उपस्थित राहत असल्याने इतर दिवशी दाखल्यांसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

दूरवरून, अगदी चंद्रपूर आणि नागपूर येथूनही नागरिक जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी नागभीड पंचायत समितीत येतात. मात्र, कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. सकाळी साडेनऊच्या सुमारास कार्यालयात पोहोचलेल्या नागरिकांना कामासाठी सायंकाळपर्यंत ताटकळत बसावे लागत असल्याची तक्रार आहे. आठवड्यातील दोनच दिवस कामकाज होत असल्याने या दिवशी अर्जदारांची मोठी गर्दी होते. परिणामी संबंधित कर्मचाऱ्यावर कामाचा प्रचंड ताण पडत असून, वेळेअभावी नागरिकांच्या कामांनाही विलंब होत आहे.

Chandrapur News | सहा महिन्यांपासून जन्म-मृत्यू नोंदणी विभाग वाऱ्यावर! पंचायत समिती नागभीड येथील प्रकार
Chandrapur Murder | पत्नीच्या विरहातून पित्याचे क्रौर्य; ८ वर्षीय मुलाची हत्या! दोन मुलांवर केला ब्लेडने हल्ला

अनेक महत्त्वाच्या कामांसाठी दाखले अनिवार्य

जन्म दाखला हा शाळा-महाविद्यालयातील प्रवेश, आधार कार्ड, पासपोर्ट, नोकरी तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असतो. त्याचप्रमाणे मृत्यू दाखला हा वारस हक्क, मालमत्ता हस्तांतरण, बँक व्यवहार, विमा दावे आणि पेन्शनसह अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आवश्यक असतो. त्यामुळे या दाखल्यांची प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. मात्र, पूर्णवेळ कर्मचारी नसल्याने नागरिकांसाठी ही प्रक्रिया जिकिरीची आणि वेळखाऊ ठरत आहे.

या गंभीर परिस्थितीची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पंचायत समितीच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात आरोग्य विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक तसेच निरीक्षकांची पूर्णवेळ नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नियमित कर्मचारी उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.

तात्पुरत्या स्वरूपात आरोग्य सहाय्यकाची नियुक्ती “संबंधित विभागाचे विस्तार अधिकारी डिसेंबर महिन्यात निवृत्त झाले. त्यानंतर पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने आरोग्य सहाय्यकाची या पदावर तात्पुरती नेमणूक करण्यात आली आहे.”

 स्नेहल लाड, गटविकास अधिकारी, पंचायत समिती नागभीड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news