अंकित बोबाटे  Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Accident | राजुरा-आसिफाबाद मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; युवकाचा जागीच मृत्यू, संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

सोंडा गावाजवळ तीन तास वाहतूक ठप्प; ग्रील कंपनीच्या ट्रकच्या बेदरकार वाहतुकीविरोधात नागरिकांचा संताप

पुढारी वृत्तसेवा

Rajura Asifabad Road Accident Youth Death

चंद्रपूर : राजुरा-आसिफाबाद मार्गावरील सोंडा गावाजवळ भरधाव ट्रकने दुचाकीस्वार युवकाला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अंकित रमेश बोबाटे (वय २२) असे मृत युवकाचे नाव असून या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन करत वाहतूक रोखून धरली. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

राजुरा-आसिफाबाद मुख्य मार्गावरील सोंडा गावाजवळ आज भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वार युवकाला जोरदार धडक दिल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत रास्ता रोको आंदोलन सुरू केले.

मृत युवकाचे नाव अंकित रमेश बोबाटे (वय २२ ) असे असून तो दुचाकीने आपल्या कामानिमित्त जात असताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की अंकितचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. अपघातासाठी जबाबदार असलेल्या ट्रक चालकावर कठोर कारवाई करावी, मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी तसेच रस्ते बांधकाम करणाऱ्या ग्रील कंपनीच्या वाहनांवर नियंत्रण आणावे, या मागण्यांसाठी नागरिकांनी राजुरा-आसिफाबाद मार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. तब्बल तीन तास वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, राजुरा-लक्कडकोट मार्गावर सुरू असलेल्या रस्ते बांधकामाच्या कामासाठी ग्रील कंपनीचे जड वाहने मोठ्या प्रमाणात धावत आहेत. ही वाहने अनेकदा अतिवेगाने व बेदरकारपणे चालवली जात असल्याने परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला.

विशेष म्हणजे यापूर्वीही राजुरा-कपनगाव मार्गावर ग्रील कंपनीच्या भरधाव ट्रकने प्रवासी ऑटोला धडक दिली होती. त्या भीषण अपघातात सात प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतरही वाहतुकीवर नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना अधिक तीव्र झाली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस व महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आंदोलक नागरिकांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT