

चंद्रपूर : तळोधी-नागभीड मुख्य महामार्गावर सोनेवाट (तळोधी) परिसरात रविवारी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक युवक गंभीर जखमी झाला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून महामार्गावरील वाढत्या वेगामुळे आणि नियमभंगामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मृतांमध्ये जगदीश नामदेव नेवारे (वय २६, रा. मुरपार) व शारदा यादव दुधकुरे (वय १९, रा. तळोधी) यांचा समावेश आहे. तर पियूष उर्फ मयूर कोहळे (रा. मुरपार) हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गडचिरोली येथे उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तळोधीहून सोनेवाट मार्गे मुख्य रस्त्यावर दुचाकीवरून तिघे जण ट्रिपल सीटने जात होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या सांकेत ट्रॅव्हल्स (MH 15 AK 1704) या प्रवासी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिन्ही जण ट्रॅव्हल्सच्या पुढील भागात जाऊन आदळले.
या अपघातात दुचाकी पूर्णपणे चकनाचूर झाली असून तिचे समोरील चाक दूरवर फेकले गेले. घटनास्थळी अपघाताचे भीषण चित्र पाहून नागरिकही स्तब्ध झाले. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती.
स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत जखमी पियूष कोहळे याला तातडीने रुग्णालयात हलविले. काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली व वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार राहुल गुहे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय लांबट व मानकर करीत आहेत.