

Shankarpur Bhisi road accident
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील शंकरपूर-भिसी राज्य महामार्गावरील आसोला बसस्थानकाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची भीषण घटना आज सोमवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली.
मृतकांमध्ये भद्रावती तालुक्यातील शेगाव खुर्द येथील अमोल अरुण नन्नावरे (वय ३०) आणि चिमूर तालुक्यातील टिटवी येथील विकास दाजीबा जांभुळे (वय ३७) यांचा समावेश आहे. विकास आणि अमोल हे साळा-भाटवा नातेसंबंधातील असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकास जांभुळे यांची सासुरवाडी शंकरपूरजवळील इरव्हा येथे असून, दोघेही तेथे पाहुणचारासाठी गेले होते. सोमवारी सकाळी सासुरवाडीतून गहू व इतर धान्य घेऊन दुचाकीने टिटवीकडे परत जात असताना आसोला बसस्थानकाजवळ मागून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, दोघेही सुमारे २५ फूट अंतरापर्यंत रस्त्यावर फरफटत गेले आणि रस्त्याच्या कडेला फेकले गेले. या अपघातात दोघांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. विशेषतः डोक्याला जबर मार लागल्याने दोघांचाही मेंदू बाहेर आल्याची हृदयद्रावक स्थिती होती. त्यामुळे दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच शंकरपूर पोलीस चौकीचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी चिमूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
मृत विकास जांभुळे हे मिस्त्री कामासोबत शेती व्यवसायही करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, सात वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी असा परिवार आहे. तर अमोल नन्नावरे यांचे अद्याप लग्न झाले नव्हते. या दुर्दैवी घटनेमुळे टिटवी व शेगाव खुर्द गावांमध्ये शोककळा पसरली आहे.