शेतकऱ्यांनी घटनास्थळी वनविभाग व स्थानिक आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत घेराव घातला  Pudhari
चंद्रपूर

Nagbhid Farmers Protest | नागभीडमध्ये शेतकऱ्यांचा जनआक्रोश; वाघाला पकडण्यास अपयश आल्याने वनविभागाला घेराव

“आश्वासनांचा पाऊस, पण कारवाई शून्य” – नुकसानभरपाई न मिळाल्याने आणि वाघ न पकडल्याने संतप्त शेतकरी आक्रमक

पुढारी वृत्तसेवा

Nagbhid Tiger Capture failure

चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील मींथुर परिसरात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर गावकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. शेकडो शेतकऱ्यांनी घटनास्थळी एकत्र येत वनविभाग व स्थानिक आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत घेराव घातला. वाघाला तात्काळ पकडण्यासह नुकसानभरपाई देण्याची मागणी करत परिसरातील वातावरण चांगलेच तापले आहे.

मींथुर येथे ४ एप्रिल रोजी शेतात मोहफूल वेचत असताना हरिदास कुबडे (वय ५८) यांच्यावर वाघाने हल्ला करून त्यांचा जीव घेतला. या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज शेकडो शेतकरी घटनास्थळी एकत्र येत वनविभागाच्या निष्काळजीपणाविरोधात आक्रमक झाले.

गावकऱ्यांच्या मते, १८ मार्च रोजीच कुमदेव म्हशाखेत्री यांच्या शेतात वाघ दिसल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि त्याचा परिणाम म्हणून एका निष्पाप शेतकऱ्याचा बळी गेला, असा गंभीर आरोप आंदोलकांनी केला.

१५० हेक्टर शेती ठप्प; वाघाची भीती कायम

ज्या परिसरात कुबडे यांचा मृत्यू झाला, त्या भागात सुमारे १५० हेक्टर शेती आहे. सध्या मका आणि धान पिके उभी असूनही वाघाच्या भीतीमुळे शेतकरी शेतात जाण्यास धजावत नाहीत. परिसरात वाघ, वाघीण आणि पिल्ले मिळून सुमारे पाच वाघ असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून तातडीने वाघांना पकडावे किंवा नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

“आश्वासनांची फसवणूक” – शेतकऱ्यांचा आरोप

वनविभागाने ६ एप्रिल रोजी चार दिवसांत वाघ पकडण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर ९ एप्रिल रोजी पुन्हा दोन दिवसांत कारवाई करण्याचे सांगण्यात आले. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे. “नुसती आश्वासने देऊन आमची टिंगल केली जात आहे,” असा आरोप आंदोलकांनी केला.

नुकसानभरपाईचा चेकही रखडला

मृत हरिदास कुबडे यांच्या कुटुंबीयांना अद्याप पूर्ण नुकसानभरपाई मिळालेली नाही. अंत्यसंस्कारासाठी २५ हजार रुपये देण्यात आले होते, तसेच ९ लाख ७५ हजार रुपयांचा चेक देण्यात आला होता. मात्र, तो जमा करण्यासाठी गेल्यावर “बीडीएस झाले नाही” असे कारण देत चेक फाडण्यास सांगण्यात आले, असा आरोप कुबडे यांचे पुतणे विवेक यांनी केला. नंतर नवीन चेक आमदारांच्या हस्ते देण्यात येईल असे सांगण्यात आले, परंतु अद्याप तो मिळालेला नाही. वन विभागाला वाघाला पकडण्याची चिंता नाही, परंतु आमदारांच्या हस्ते चेकचे वाटप करण्याची चिंता असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.

आमदारांविरोधातही संताप

या आंदोलनात महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्थानिक आमदार  विरोधातही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. “घटना घडून इतके दिवस झाले तरी आमदार भेटायला आले नाहीत. शेतकऱ्यांचे उभे पीक नष्ट होत आहे, तरीही दुर्लक्ष केले जात आहे,” असा आरोप आंदोलकांनी केला.

या ठिय्या आंदोलनात मिंडाळा, मींथुर, नवेगाव, कोदेपार आणि खैरी चक या गावांतील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. नागभीड वनपरिक्षेत्रातील मींथुर परिसरात निर्माण झालेल्या या तणावपूर्ण परिस्थितीमुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

वाघाच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचे जीव आणि उपजीविका दोन्ही धोक्यात आले आहेत. वनविभागाने तात्काळ ठोस कारवाई करून वाघांना पकडावे आणि बाधित कुटुंबांना न्याय द्यावा.  अन्यथा हा जनआक्रोश आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT