

Pickup van overturns Korpana Chandrapur
चंद्रपूर: कोरपना तालुक्यात लग्नसमारंभाचा आनंद क्षणार्धात दुःखात बदलल्याची धक्कादायक घटना घडली. वऱ्हाड्यांना घेऊन परतणाऱ्या पिकअपसमोर अचानक रानडुकरांचा कळप आल्याने वाहन चालकाचे नियंत्रण सुटून पिकअप उलटली. या भीषण अपघातात १२ जण जखमी झाले असून त्यापैकी ६ जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
तालुक्यातील चनई बूज ते खैरगाव मार्गावर सोमवारी (दि. १३ एप्रिल) रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला. हातलोणी येथील नागरिक चोपण येथे हनुमंत पंधरे यांच्या घरी लग्न समारंभासाठी एमएच ३४ सी क्यू १००८ क्रमांकाच्या पिकअप वाहनाने गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्वजण आनंदात घरी परतत असताना काळाने अचानक घाला घातला.
मिळालेल्या माहितीनुसार, चनई बूज-खैरगाव मार्गावर वाहन पोहोचताच अचानक रस्त्यावर रानडुकरांचा मोठा कळप आडवा आला. या वन्यप्राण्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने अचानक ब्रेक मारला. मात्र, वाहनाचा वेग अधिक असल्याने नियंत्रण सुटले आणि पिकअप रस्त्याच्या मधोमध उलटली. अपघात इतका भीषण होता की वाहनातील प्रवासी इकडे-तिकडे फेकले गेले.
या दुर्घटनेत एकूण १२ जण जखमी झाले. त्यापैकी ६ जण गंभीर जखमी असून त्यांना तातडीने चंद्रपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. गंभीर जखमींमध्ये विकास लिंगू किनाके (२३), विक्रम मेश्राम (२०), शिवम कोवे (२०), अनुज लिंगू उदे, रामू हनुमान कोरांगे (२२) आणि साक्षी भास्कर किनाके (१९) यांचा समावेश आहे.
तर इतर जखमींवर कोरपना ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात रणवीर देविदास आत्राम (२३), जोशना प्रमोद कुमरे (२४), प्रांजली शंकर किनाके (१९), सौरभ मोतीराव मडावी (१९), गणेश संतोष कोवे (१७) आणि त्रिशा विठ्ठल गेडाम (रा. हातलोणी) यांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात नातेवाईक आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.
वन्यप्राण्यांमुळे झालेल्या या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, कोरपना पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.