

Chandrapur Saoli Black Magic Aghori Puja
चंद्रपूर : भोंदूबाबा प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडालेली असतानाच चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुप्तधनाच्या आमिषाने मागील दोन वर्षांपासून विधवा व कुमारिका महिलांचा वापर करून अघोरी विधी केल्याची माहिती समोर आल्याने जिल्हा हादरला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील चिंचडोह बॅरेज परिसरात वनविभागाने कारवाई करत कासवांची तस्करी उघडकीस आणली आणि त्याचवेळी या अघोरी रॅकेटचा भांडाफोड झाला. १२ एप्रिल रोजी सावली वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी तीन दुचाकींवरून दोन जिवंत कासवांची तस्करी करणाऱ्या सहा जणांना अटक केली. गंगाधर बुरांडे, मोरेश्वर देवतळे, ओम शिंदे, हेमचंद शेंडे, धवल वेलादी आणि राजेंद्र दिवसे अशी आरोपींची नावे आहेत.
अटकेनंतर आरोपींच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली असता धक्कादायक माहिती समोर आली. मोबाईलमध्ये अघोरी पूजेचे किळसवाणे व्हिडिओ, स्मशानभूमीत मध्यरात्री केलेल्या विधींचे चित्रीकरण, तसेच घुबड व कासवांचे फोटो आढळले. याशिवाय अनेक तरुण मुली आणि विधवा महिलांचे फोटो, त्यांच्या जन्मकुंडल्या, तसेच अत्यंत खाजगी स्वरूपाची माहितीही सापडली. काही महिलांच्या मासिक पाळीच्या तारखांची नोंद ठेवण्यात आल्याचेही उघड झाले आहे.
या सर्व प्रकारामुळे महिलांचे मोठ्या प्रमाणावर लैंगिक शोषण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी या प्रकरणाचा भांडाफोड केला आहे.
तपासात उघड झाले की, या टोळीचे जाळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील चिमूर, पोंभुर्णा आणि चामोर्शी या ग्रामीण भागांपर्यंत पसरलेले आहे. सुमारे ५० मध्यस्थ या रॅकेटमध्ये कार्यरत होते. हे मध्यस्थ महिलांची माहिती, फोटो व कुंडल्या मुख्य मांत्रिकाकडे पाठवत होते. या मांत्रिकाला ‘टेस्टर’ असे संबोधले जात होते. तोच अघोरी पूजेसाठी व्यक्ती किंवा प्राणी ‘योग्य’ आहे की नाही, हे ठरवत असे.
यानंतर निर्जन स्थळे किंवा स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी विधी पार पाडले जात होते. गुप्तधन मिळवून देणे, पैशाचा पाऊस पाडणे अशा आमिषांद्वारे गरीब व श्रीमंत अशा दोन्ही स्तरांतील लोकांना फसवले जात होते. आरोपींनी अघोरी पूजेतून सोन्याची बिस्किटे मिळाल्याचा बनाव रचला होता; मात्र वनविभागाच्या कारवाईदरम्यान ही बिस्किटे बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, या प्रकरणातील सहा आरोपी सध्या वनकोठडीत असून मुख्य सूत्रधार असलेला मांत्रिक आणि त्याचा सहकारी महाराज अद्याप फरार आहेत. गुरुवारी (ता. १६) आणखी दहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते हरीभाऊ पाथोडे यांनी सांगितले की, पुराणांमध्ये घुबड आणि कासव यांचा संबंध धनसंपत्तीशी जोडला गेल्याने अशा अघोरी पूजांमध्ये त्यांचा वापर केला जातो. विधवा आणि कुमारिका महिला या अशा भोंदूबाबांचे सहज लक्ष्य बनतात, कारण त्यांना फसवणे सोपे असते.
या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, या अघोरी जाळ्यात अजून किती महिला अडकल्या आहेत, याचा उलगडा पुढील तपासात होण्याची शक्यता आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता लवकरच तपास पोलिस विभागाकडे वर्ग केला जाणार असून मुख्य मांत्रिकापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.