चुरशीच्या झालेल्या चंद्रपूर महापौर निवडणुकीत भाजपने केवळ एका मताने विजय प्राप्त केला. 'ईश्वर' चिठ्ठीत ठाकरे शिवसेनेचे प्रशांत दानव भाग्यवान ठरले.
Chandrapur Mayor Election
चंद्रपूर : संपूर्ण विदर्भाचे लक्ष वेधलेल्या चंद्रपूर महानगरपालिका महापौर निवडणुकीत भापने बाजी मारली आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपने केवळ एका मताने विजय प्राप्त केला. भाजपच्या संगीता खांडेकर महापौर, तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रशांत दानव हे उपमहापौर झाले. या दोघांनाही 32 मते मिळाली. उपमहापौर निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे उमेदवार पप्पू देशमुख यांनाही 32 मते पडल्याने उपमहापौर पदासाठी 'ईश्वर' चिठ्ठी काढण्यात आली. यात दानव भाग्यवान ठरले.
चंद्रपुर महानगरपालिकेमध्ये एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने सत्तेची चावी ठाकरे सेनेच्या हाती होती. ठाकरे सेनेने महापौर पदासाठी सुरुवातीपासून आग्रही भूमिका घेतली होती. राज्यात मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसशी वारंवार बोलणी झाली. मात्र त्याला यश येऊ शकले नाही. आज शेवटच्या क्षणीही शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे आणि विजय वडेट्टीवार यांच्या अंतिम बोलणी झाली, पण ती फिस्कटली. त्याचवेळी भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी गिऱ्हे यांची भेट सेनेल राजी केले. सव्वा सव्वा वर्षांचा फॉर्म्युला नक्की करण्यात आला. दोन्ही पक्षांनी यावर सहमती दर्शवली आणि शेवटच्या क्षणी म्हणजे दहा वाजता युतीचा निर्णय जाहीर करण्यात आला. हा काँग्रेसला मोठा धक्का होता.
आज (दि. १०) सकाळपासून सुरू झालेल्या नाट्यमय घडामोडी सदस्य सभागृहात जाईपर्यंत सुरू होत्या. पण काँग्रेसने शिवसेनेचे मन वळवण्यात फार उत्साह न दाखवल्याने हातची संधी या पक्षाला गमवावी लागली. या सर्व घडामोडीत MIM चे सदस्य अझर शेख यांच्या भूमिकेने सर्वांना बुचकळ्यात टाकले. त्यांनी महापौर निवडीत तटस्थ भूमिका घेतली, तर उपमहापौर निवडीत काँग्रेस आघाडीला समर्थन दिले. दुसरीकडे काँग्रेस बंडखोर प्रशांत दानव यांनी ऐनवेळी ठाकरे सेनेत प्रवेश करीत उपमहापौर पद मिळवले. राज्याच्या राजकारणात ठाकरे सेनेची भूमिका भाजपविरोधी असली, तरी इथे मात्र त्यांनी भाजपला समर्थन दिल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे. वंचितने मात्र सभागृहाबाहेर राहून एकप्रकारे भाजपला मदतच केल्याचे दिसून आले.
भाजप 23
शिंदे सेना 1
ठाकरे सेना 7
अपक्ष 1
एकूण 32
____
काँग्रेस 27
जनविकास सेना 3
बसप 1
एकूण 31
चंद्रपूरमध्ये बहुमताच्या जवळ आमचा आकडा होता. पण आम्हाला ज्यांच्याकडून अपेक्षा होती, त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. जे सेक्युलर पक्ष होते. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम होते, त्यांनी कुठेतरी अप्रत्यक्षपणे भाजपला पाठिंबा दिला. ते सभागृहात हजर राहिले नाहीत. त्यामुळे आम्हाला चंद्रपूरात सत्ता गमवावी लागली.प्रतिभा धानोरकर, काँग्रेस खासदार
चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचे 31 नगरसेवक आहेत पण, बहुमताचा आकडा 34 आहे. आम्ही उद्धवसेनेला स्थायी समिती आणि उपमहापौर पद द्यायचे कबूल केले, पण त्यांना भाजपाकडून ऑफर असल्याची त्यांनी माहिती दिली. कारण त्यांना महापौरपद पाहिजे आहे. आम्हाला महापौर पद देईल त्याच्यासोबत आम्ही जाऊ, अशी भूमिका उद्धवसेनेची सुरुवातीपासूनच आहे. काहीच नाही झाले तर आम्ही विरोधी पक्षात बसू.काँग्रेस नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार