Narcotics Cases Chandrapur
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक आणि सेवनाविरोधात पोलिस विभागाने गेल्या सहा महिन्यांत व्यापक मोहीम राबवित ११९ गुन्हे दाखल केले असून १५८ जणांवर कारवाई केली आहे. या कारवाईत ३९ लाख ५४ हजार ६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा नशामुक्त करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने आणि प्रभावीपणे काम करावे, असे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी दिले.
अंमली पदार्थांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीची बैठक नुकतीच अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत पोलिस विभागाने गेल्या सहा महिन्यांतील कारवाईचा सविस्तर आढावा सादर केला.
पोलिस विभागाच्या माहितीनुसार, गांजा बाळगल्याप्रकरणी १५ गुन्ह्यांमध्ये २७ जणांवर कारवाई करण्यात आली. एमडी पावडर बाळगल्याच्या आठ प्रकरणांमध्ये १५ आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले, तर पॉपी स्ट्रॉ बाळगल्याच्या एका प्रकरणात दोन जणांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय अंमली पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी ९५ गुन्हे नोंदवून ११४ जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
बैठकीत डॉ. व्यवहारे यांनी अंमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास ती तात्काळ पोलिस विभागाला कळविण्याचे आवाहन केले. तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकू नये यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर कार्यशाळांचे आयोजन करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्ह्यातील रासायनिक उत्पादन करणाऱ्या उद्योगांची नियमित तपासणी करून त्यांच्या उत्पादन प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. उद्योगांची स्थापना, उत्पादनाचा प्रकार आणि कार्यपद्धतीची पडताळणी करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
एमआयडीसी परिसरातील रिकाम्या जागांचा वापर कोणत्याही बेकायदेशीर उत्पादनासाठी होत नाही ना, याची तपासणी करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. तसेच वन विभाग आणि कृषी विभागाने जिल्ह्यात गांजा अथवा खसखशीची बेकायदेशीर लागवड होणार नाही, यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीला उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक कांक्रेडवार, योगेश हिवसे, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सुहास सावंत, उपशिक्षणाधिकारी गणेश येळणे, टपाल विभागाचे प्रशांत कन्नमवार तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.