

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक कारवाई करत वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदोरी टी-पॉईंट परिसरातून तब्बल ५ लाख १५ हजार ८५८ रुपयांचा विदेशी दारूसाठा व इतर मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैध दारू तस्करी रोखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ३० जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या वरोरा पथकाला नांदोरी टी-पॉईंट परिसरातून विदेशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून संशयित वाहनाची प्रतीक्षा केली. काही वेळाने संशयास्पद हालचाली करणारी टोयोटा एटिओस ही कार आढळून आली. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूचा साठा आढळला.
तपासणीत कारमधून विदेशी दारूच्या एकूण २९ पेट्या जप्त करण्यात आल्या. या पेट्यांमध्ये ७५० मिली क्षमतेच्या ३५३ बाटल्या असून त्यांची अंदाजे किंमत १ लाख ८३ हजार ८५८ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली सुमारे ३ लाख रुपये किमतीची टोयोटा एटिओस कार आणि ३० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ५ लाख १५ हजार ८५८ रुपये इतकी आहे.
या कारवाईत नरेंद्र जितेंद्र भाट (वय ३१) आणि दामिनी नरेंद्र भाट, दोघेही रा. जलनगर, चंद्रपूर, यांना पोलिसांनी अटक केली. तर या प्रकरणातील आणखी एक आरोपी सूर्य उर्फ सूरज परसंगी हा घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखा आणि वरोरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.