Chandrapur Crime : एमडी ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपीला राजस्थानातून अटक; भद्रावती पोलिसांची कारवाई

Chandrapur Crime
Published on
Updated on

चंद्रपूर : भद्रावती येथील एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपीचा शोध घेत भद्रावती पोलिसांनी थेट राजस्थान गाठत आरोपीला अटक केली आहे.

भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ६३२/२०२६ अंतर्गत कलम २२(क), २२(क), २९ अन्वये तसेच गुंगीकारक औषधे आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आधी अटक करण्यात आलेल्या आरोपी अब्दुल सिराज अब्दुल गफ्फार याच्याकडे केलेल्या चौकशी, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आणखी एका आरोपीचा सहभाग निष्पन्न झाला.

तपासादरम्यान आरोपी आफिक जावेद ऊर्फ टिपू सलीम जावेद खान (वय ३०), रा. मारवाड जंक्शन, जिल्हा पाली (राजस्थान) याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले. त्यानंतर भद्रावती पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे विशेष पथक राजस्थानमध्ये रवाना करण्यात आले. स्थानिक पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने मारवाड जंक्शन परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर १९ जून रोजी सकाळी आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेनुसार ट्रान्झिट वॉरंट मिळवून आरोपीला भद्रावती येथे आणण्यात आले.

पोलिसांनी आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीकडून अमली पदार्थांचे जाळे, आर्थिक व्यवहार, इलेक्ट्रॉनिक पुरावे तसेच या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींबाबत सखोल चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक इश्वर काटकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल, पोलीस निरीक्षक योगेश्वर पवार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शोधमोहिमेत पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, पोहेकॉ संतोष चेलपुरवार, जयरोहित व इतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

दरम्यान, एमडी ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार व त्याच्या संपर्कातील इतर आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news