Air quality index Chandrapur report
चंद्रपूर : नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यातच चंद्रपूर शहरासाठी चिंताजनक वास्तव समोर आले आहे. जानेवारी २०२६ या महिन्यात ३१ दिवसांपैकी तब्बल ३० दिवस हवा प्रदूषित आढळून आली असून, केवळ एकाच दिवशी हवा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक नोंदवण्यात आला आहे. थंडीचा प्रभाव, वाढती वाहतूक, कचरा ज्वलन आणि बायोमास बर्निंगमुळे शहरातील प्रदूषणात मोठी वाढ झाल्याची माहिती पर्यावरण व हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे.
चंद्रपूर शहरात जानेवारी महिन्यात हवा प्रदूषणाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI)च्या आकडेवारीनुसार या महिन्यात एकही दिवस ० ते ५० AQI (Good) म्हणजेच आरोग्यासाठी चांगल्या श्रेणीत आढळून आला नाही. ५१ ते १०० AQI (Satisfactory) या समाधानकारक श्रेणीत केवळ एक दिवस नोंदवला गेला आहे.
विशेष म्हणजे १०१ ते २०० AQI (Moderate) म्हणजेच सर्वसाधारण प्रदूषित श्रेणीत तब्बल ३० दिवस नोंदवले गेले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे २०१ ते ३०० (Poor), ३०१ ते ४०० (Very Poor) आणि ४०१ ते ५०० (Severe) या अधिक धोकादायक श्रेणीत एकही दिवस गेलेला नाही.
प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले की, हवा गुणवत्ता निर्देशांक ठरवताना किमान ३ ते कमाल ८ प्रदूषकांचा विचार केला जातो. यामध्ये धूलिकण PM10, PM2.5, ओझोन, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, अमोनिया व लीड यांचा समावेश असतो. जानेवारी महिन्यात PM10 धूलिकण सर्वाधिक २९ दिवस आढळून आले, तर PM2.5 केवळ १ दिवस आणि कार्बन मोनॉक्साईड १ दिवस नोंदवला गेला. यावरून धूळ, कचरा ज्वलन व वाहनांमुळे प्रदूषण वाढल्याचे स्पष्ट होते.
चंद्रपूर शहर व परिसरात थर्मल पॉवर प्लांट, विविध उद्योग, घरगुती कोळसा ज्वलन, वाहनांची वाढती संख्या, रस्त्यावरील धूळ, कचरा ज्वलन, तसेच सुरू असलेली बांधकामे व स्थानिक उद्योग ही प्रदूषणाची प्रमुख कारणे ठरत आहेत. विकासकामांसोबत वाहनसंख्या वाढत असल्याने मोठ्या प्रमाणावर धूर व धूळ वातावरणात मिसळत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरूनही राज्यातील बहुतांश शहरांमध्ये प्रदूषणात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येते.
हिवाळ्यात थंडी व संथ वाऱ्यांमुळे प्रदूषके वाहून न जाता एका ठिकाणी साचतात. यामुळे पूर्वी आरोग्यासाठी चांगला मानला जाणारा हिवाळा अलीकडे धोकादायक ठरत आहे. प्रदूषणामुळे आधीपासून श्वसनविकार असलेल्या रुग्णांना गंभीर त्रास होतो, तसेच नव्याने दमा, ब्रॉन्कायटिस, क्षयरोग (टीबी), हृदयविकार व मानसिक आजारांमध्ये वाढ होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी वृक्षसंवर्धन व वृक्षलागवड वाढवणे, सायकलचा वापर प्रोत्साहित करणे, सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर, तसेच बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. वाहनसंख्या कमी करणे, कचरा जाळण्यावर बंदी, उद्योगांनी प्रदूषण नियंत्रणाचे नियम काटेकोरपणे पाळणे आणि नागरिकांनीही जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. स्मॉग टॉवर, फॉग मशीन व कृत्रिम पाऊस हे तात्पुरते उपाय असले तरी प्रशासनाने कडक आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवल्यासच प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण शक्य होईल, असे मत प्रा. चोपणे यांनी व्यक्त केले आहे.