Chandrapur Mayor Election | काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे भाजपला चंद्रपुरात सत्तास्थापनेची संधी?

आमदार किशोर जोरगेवार यांचा दावा, काँग्रेसमधील फुटीवर घणाघात, १५ नगरसेवक निर्णायक ठरणार
Chandrapur Mayor Election
आमदार किशोर जोरगेवार
Published on
Updated on

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि असमाधान याचा भाजपला फायदा होण्याची शक्यता आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे. भाजपकडे २४ तर काँग्रेसकडे २७ नगरसेवक असले तरी इतर १५ नगरसेवक निर्णायक ठरणार असून, त्यांच्याशी सातत्याने संपर्क सुरू असल्याचा दावा जोरगेवार यांनी केला आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांना जवळपास समान संधी मिळालेली आहे. भाजपचे २४ तर काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आले असून, उर्वरित १५ नगरसेवकांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

जोरगेवार यांनी सांगितले की, “काँग्रेसमध्ये सध्या अनेक गट निर्माण झाले आहेत. काही नगरसेवकांमध्ये नाराजी असून ते वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसमधील काही नगरसेवक हे भाजपच्या संपर्कात असून, विकासासाठी भाजपसोबत जाण्याचा त्यांचा कल आहे.”

निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची बांधिलकी ही जनतेसोबत असते आणि पाच वर्षांचा कार्यकाळ प्रभावीपणे पार पाडण्यासाठी नियोजनबद्ध निधी आवश्यक असतो. मात्र, काँग्रेसकडे तो नियोजन आणि निधी नसल्याने प्रभाग विकासासाठी भाजपसोबत सत्ता स्थापन करणे योग्य ठरेल, अशी भूमिका काही नगरसेवक घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

चंद्रपूरमधील राजकीय स्थिती आणि भाजपकडे असलेले संख्याबळ मुख्यमंत्री, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासमोर मांडण्यात आले असल्याचेही जोरगेवार यांनी सांगितले. भाजपकडून गटनेतेपदाचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील आणि त्यानुसार पुढील दिशा ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावरही जोरगेवार यांनी थेट निशाणा साधला. “एखाद्या नेत्यामध्ये अहंकार निर्माण झाला की तो अशा प्रकारची भाषा करतो. माझ्या मृत्यूची कामना कोणीही करू नये. वडेट्टीवारांसारखे शंभर लोक जरी आले तरी मला कोणीही मारू शकत नाही, कारण माझ्या पाठीशी जनतेचा आशीर्वाद आहे,” असे जोरदार प्रत्युत्तर त्यांनी दिले.

काँग्रेसमध्ये वारंवार गट तयार होतात, फुटतात, हे नवीन नाही. काँग्रेस नेहमी दुसऱ्या टर्ममध्ये फुटलेली आहे. याआधीही महापौर काँग्रेसमधून बाहेर पडले आहेत. काँग्रेसमधील फुटाफुटी थांबवण्याची ताकद स्वतः विजय वडेट्टीवार यांच्याकडे नाही, असा आरोपही त्यांनी केला. समृद्धी महामार्गावर घडलेल्या घटनेचा उल्लेख करत काँग्रेसमधील अहंकार आणि नैराश्य उघड झाले असल्याचे सांगत, २७ नगरसेवक असूनही इतरांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याऐवजी काँग्रेसमध्ये अंतर्गत स्पर्धा सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी गट स्थापन करून नोंदणी केल्यानंतर नगरसेवकांना परत आणण्यासाठी दबाव, डांबून ठेवणे आणि अपहरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप करत, हा प्रकार लोकशाहीविरोधी असल्याची टीका जोरगेवार यांनी केली. “काँग्रेसला फक्त सत्ता हवी आहे, जनतेची सेवा करणे हा त्यांचा उद्देश नाही,” असा घणाघात त्यांनी केला. एकूणच चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेचा संघर्ष अधिक तीव्र होत असून, येत्या काही दिवसांत राजकीय समीकरणे कोणत्या दिशेने जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news