

वर्धा: पुण्याकडून परतणाऱ्या चंद्रपूरच्या नगरसेवकांचे वाहन वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर गणेशपूर शिवारात अडवून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याची तक्रार सावंगी (मेघे) पोलिस ठाण्यात करण्यात आली. ही घटना २९ जानेवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास घडली. तक्रारीवरून सावंगी (मेघे) पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर येथील नगरसेवक राजेश मुरली अड्डर हे त्यांची पत्नी तसेच काही त्यांचे मित्र नगरसेवक परिवारासह पुण्याला फिरायला गेले होते. २८ जानेवारी रोजी ते ट्रॅव्हल्सने समृद्धी महामार्गाने परत येत होते. दरम्यान मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर २९ जानेवारी रोजी पहाटे सहा वाजताच्या सुमारास पाच ते सहा चारचाकी वाहने अचानक ट्रॅव्हल्सच्या पुढे येऊन थांबली आणि रस्ता अडविला. त्यामुळे ट्रॅव्हल्सचालकाने ट्रॅव्हल्स थांबविली. त्यावेळी सौरभ ठोंबरेसह दहा ते १५ जणांनी वाहनातून उतरून ट्रॅव्हल्सजवळ येत सोबत येण्यास सांगितले. तेव्हा विचारणा केली असता वाद करत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
आरडाओरड केली असता वाहनाने आलेले व्यक्ती वाहने घेऊन वर्ध्याच्या दिशेने निघून गेले. एकाला त्यांनी पकडून ठेवले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सावंगी (मेघे) पोलिसांनी घटनास्थळ गाठून एकास ताब्यात घेतले. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी भेट दिली. याप्रकरणी सावंगी (मेघे) पोलिस ठाण्यात तक्रारीवरून कनैन शमीम सिद्धीकी, मुजम्मील खान, सौरभ ठोंबरे, जासीम खान, आलोक रोहिदास, अदनान शेख आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पुढील तपास ठाणेदार पंकज वाघोडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.