

Farmer killed by tiger Chorgaon
चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांमध्ये मानव–वन्यजीव संघर्ष अधिकच गडद होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. चंद्रपूर तालुक्यातील चोरगाव येथे वाघाच्या हल्ल्यात एका वृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, गेल्या एका महिन्यात वाघाच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ताडोबा जंगलालगत असलेल्या चोरगाव येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. उद्धव वारलूजी मोहुर्ले (वय ६५ ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
३० जानेवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास उद्धव मोहुर्ले हे वरवट–चोरगाव मार्गावरील स्वतःच्या शेतात शेतीच्या कामासाठी गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. वाघाने त्यांना ठार मारून मृतदेह जंगलाच्या दिशेने ओढून नेल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच वन विभाग व पोलीस प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली. मात्र अंधार पडल्याने रात्री उशिरापर्यंत मृतदेह सापडू शकला नाही. ३१ जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताडोबा जंगलातील ५८५ क्रमांकाच्या कंपार्टमेंटमध्ये मृतदेह शोधून काढला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी सकाळी १० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर येथे पाठवण्यात आला आहे. घटनेनंतर चोरगाव व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, शेती व जंगलालगतच्या कामांसाठी जाणे धोकादायक बनले आहे.
विशेष म्हणजे गेल्या एका महिन्याच्या कालावधीत वाघाच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाल्याने मानव–वन्यजीव संघर्ष गंभीर स्वरूप धारण करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक नागरिकांकडून वन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, बाधित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी तसेच गावांमध्ये सुरक्षिततेसाठी पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.