बुलढाणा

रस्त्यांवरील खड्ड्यांपासून मिळणार सुटका; अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे 'सेल्फ हिअलिंग' तंत्रज्ञान

यासोबतच या विद्यार्थ्यांनी "नाईट व्हीजीबीलिटी टेक्नॉलॉजी"वरही स्वतंत्र अभ्यास केला आहे

पुढारी वृत्तसेवा

बुलढाणा : रस्त्यांना पडणारे तडे तसेच पावसाळ्यानंतर वाढणारे खड्डे आणि रात्रीच्या वेळी रस्त्यांवर असणारी कमी दृष्यता यामुळे वाहन अपघात वाढत आहेत. या समस्येवर शेगाव येथील माऊली अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य शाखेतील राजवर्धन ठाकूर व अथर्व देशमुख या दोन विद्यार्थ्यांनी उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे

“बायो बेस सेल्फ हिअलिंग एन्ड नाईट व्हीजीबीलिटी रोड टेक्नॉलॉजी" ही संकल्पना त्यांनी विकसित केली आहे. यासाठी रस्ते बांधकाम, 'काँक्रिट टेक्नॉलॉजी' आणि भारतीय रस्त्यांच्या प्रत्यक्ष समस्यांचा अभ्यास केला. रस्ते वारंवार खराब का होतात?, दुरूस्तीचा खर्च इतका का वाढतो?, रात्री अपघात का होतात? आदी प्रश्नांवर विविध संशोधन, व्हिडिओ, आंतरराष्ट्रीय टेक्नॉलॉजी आणि अभियांत्रिकी संकल्पनांचा अभ्यास या विद्यार्थ्यांनी केला.

दरम्यान, नेदरलँड्सचे प्रसिद्ध संशोधक सेन्ट जोन्कर्स यांच्या 'सेल्फ हिअलिंग काँक्रिट टेक्नॉलॉजी'ची प्रेरणा घेऊन भारतीय हवामान आणि रस्त्यांच्या परिस्थितीनुसार या संकल्पनेवर सतत दहा महिने स्वतंत्र अभ्यास केला. रस्ते अधिक सुरक्षित आणि टिकाऊ बनवणे ह्या मुख्य उद्दिष्टासह विविध मटेरियल, मायक्रोफायबर,विशेष प्रकारचे बॅक्टेरिया आणि स्वतंत्र फॉर्म्युल्यावर त्यांनी काम केले. या अभ्यासातून 'सेल्फ हिअलिंग सिमेंट टेक्नॉलॉजी'मध्ये ७० ते ८५ टक्क्यांपर्यंत सकारात्मक परिणाम मिळाल्याचा दावा राजवर्धन ठाकूर व अथर्व देशमुख या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी केला आहे.

'सेल्फ हिअलिंग म्हणजे काय?...

'ही संकल्पना अशी आहे की, रस्त्याला तडे गेल्यानंतर पावसाचे पाणी त्या तड्यांमध्ये गेल्यास विशेष जैवाधारित घटक आणि बॅक्टेरियाच्या प्रक्रियेमुळे ते तडे नैसर्गिकरीत्या भरून निघण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे मोठे खड्डे तयार होण्यापूर्वीच रस्त्यांचे होणारे नुकसान कमी होऊ शकते‌ व दुरूस्तीवर वारंवार होणारा खर्च कमी होऊ शकतो. यासोबतच या विद्यार्थ्यांनी "नाईट व्हीजीबीलिटी टेक्नॉलॉजी"वरही स्वतंत्र अभ्यास केला.

ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये रस्त्यावर रात्री पुरेशी प्रकाश व्यवस्था नसते. त्यामुळे वाहनचालकांना 'डिव्हायडर', 'रोड मार्किंग' आणि रस्त्याची वळणे नीट दिसत नाहीत. यावर उपाय म्हणून 'ग्लोइंग रोड पेंट'ची संकल्पना त्यांनी विकसित केली. ऑस्ट्रेलियातील काही रोड टेक्नॉलॉजी प्रकल्पांचा अभ्यास करून,भारतीय परिस्थितीनुसार छोटा प्रोटोटाइप तयार केला.

या तंत्रज्ञानाचा प्रथम प्रयोग त्यांनी श्री संत गजानन महाराज मंदिर परिसर आणि शेगांव रेल्वे स्टेशन परिसरात प्रायोगिक स्तरावर करून पाहिला. रात्रीच्या वेळी 'रोड लाईन्स' आणि 'डिव्हाइडर' अधिक स्पष्ट दिसल्याचे सकारात्मक परिणाम मिळाले.हा प्रकल्प विविध स्पर्धांमध्येही सादर करण्यात आला. गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये या प्रकल्पाला द्वितीय क्रमांक मिळाला. तसेच रिसर्च पेपर स्पर्धेतही द्वितीय पारितोषिक मिळाले.

या तंत्रज्ञानाच्या 'युटीलिटी पेटंट'साठी अर्ज दाखल केला असून भविष्यात यावर अधिक संशोधन करून रस्ते प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा मानस राजवर्धन ठाकूर व‌ अथर्व देशमुख या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT