Misinformation spread WhatsApp | विवेकाला अडसर ‘व्हॉटस्अ‍ॅप विद्यापीठा’चा

Misinformation spread WhatsApp |
Misinformation spread WhatsApp | विवेकाला अडसर ‘व्हॉटस्अ‍ॅप विद्यापीठा’चा
Published on
Updated on

अ‍ॅड. प्रदीप उमाप, कायदे अभ्यासक

‘व्हॉटस्अ‍ॅप विद्यापीठ’ हा शब्द आजच्या काळात उपरोधिकपणे रूढ झालेला आहे. समाजमाध्यमांवर येणार्‍या अविश्वसनीय, दिशाभूल करणार्‍या आणि बनावट बातम्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवणार्‍यांना उद्देशून हा शब्दप्रयोग वापरला जातो. माहितीचा स्रोत आणि सत्यता न तपासता त्यावर विश्वास ठेवणे ही या युनिव्हर्सिटीची सर्वात मोठी त्रुटी आहे. अलीकडेच देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेही यासंदर्भात अत्यंत कडक टिप्पणी केली आहे.

शबरीमला मंदिरातील महिलांविषयीचा भेदभाव आणि विविध धर्मांमधील धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार यावर सुनावणी करताना न्यायालयाने स्पष्ट केले की, आम्ही सर्व नामांकित लेखक आणि विचारांचा आदर करतो; परंतु व्हॉटस्अ‍ॅप विद्यापीठातून मिळालेले ज्ञान किंवा माहिती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाऊ शकत नाही.

भारतात ‘व्हॉटस्अ‍ॅप युनिव्हर्सिटी’ हा शब्दप्रयोग गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर रूढ झाला आहे. विशेषतः समाजमाध्यमांवरून पसरणार्‍या अर्धवट, दिशाभूल करणार्‍या किंवा पूर्णतः खोट्या माहितीच्या संदर्भात हा उपरोधिक शब्द वापरला जातो. याचा शब्दशः अर्थ कोणतीही शैक्षणिक संस्था असा नसून, तो एका विशिष्ट प्रवृत्तीवर केलेला कटाक्ष आहे. जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही अधिकृत पुराव्याशिवाय व्हॉटस्अ‍ॅपवर आलेले संदेश ‘परम सत्य’ मानून ते इतरांना फॉरवर्ड करते आणि स्वतःला त्या विषयातील तज्ज्ञ समजू लागते, तेव्हा त्याला ‘व्हॉटस्अ‍ॅप युनिव्हर्सिटी’चे शिक्षण म्हणून एक प्रकारे हिणवले जाते. या प्रवृत्तीमागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत. प्रामुख्याने माहितीचा वेग आणि तिची उपलब्धता यामुळे सर्वसामान्य वाचकाला सत्य आणि असत्य यातील पुसट रेषा ओळखणे कठीण झाले आहे. पारंपरिक वृत्तपत्रांमध्ये माहिती प्रसिद्ध होण्यापूर्वी तिची पडताळणी करण्याची एक शिस्तबद्ध प्रक्रिया असते; मात्र व्हॉटस्अ‍ॅपवर अशी कोणतीही मर्यादा नसते. परिणामी, अनेकदा क्लिष्ट ऐतिहासिक घटना किंवा वैज्ञानिक तथ्ये मोडून-तोडून अत्यंत रंजक पद्धतीने सादर केली जातात. ती सर्वसामान्यांना पटकन आकर्षित करणार्‍या शीर्षकांच्या, चित्रांच्या साहाय्याने प्रसारित केली जात असल्याने वाचक मंडळी ‘अजि म्या ब्रह्म पाहिले’ अशा आविर्भावात सदर माहिती फॉरवर्ड करून मोकळी होतात. गेल्या काही वर्षांत समाजमनाची जडणघडण करण्यात या व्हॉटस्अ‍ॅप विद्यापीठाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे; मात्र याची नकारात्मक बाजू समाजासाठी काळजीचा विषय बनली आहे. अनेकदा यातून दंगली उसळण्यापर्यंतचे प्रकार घडले आहेत.

अलीकडेच देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेही यासंदर्भात अत्यंत कडक टिप्पणी केली आहे. शबरीमला मंदिरातील महिलांविषयीचा भेदभाव आणि विविध धर्मांमधील धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार यावर सुनावणी करताना न्यायालयाने स्पष्ट केले की, आम्ही सर्व नामांकित लेखक आणि विचारांचा आदर करतो; परंतु व्हॉटस्अ‍ॅप विद्यापीठातून मिळालेले ज्ञान किंवा माहिती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाऊ शकत नाही. नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाने दाऊदी बोहरा समुदायाची बाजू मांडणार्‍या वकिलाच्या युक्तिवादावर ही टिप्पणी केली. तसेच न्या. सूर्यकांत यांनी स्पष्ट केले की, प्रख्यात न्यायशास्त्रज्ञ आणि विचारवंतांचा सन्मान आहे; परंतु त्यांची मते वैयक्तिक असतात आणि ती पुराव्याविना ग्राह्य धरता येत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाची ही टिप्पणी व्हॉटस्अ‍ॅपच्या आधारे पाजळल्या जाणार्‍या माहितीच्या नकारात्मक बाजूवर प्रकाश टाकण्यासाठी पुरेशी आहे. बनावट बातम्यांवर विश्वास ठेवणार्‍या प्रवृत्तीवर न्यायालयाने केलेला हा तीक्ष्ण प्रहार आहे.

अलीकडच्या काळात राजकीय संदेश आणि प्रचाराच्या प्रसारासाठी व्हॉटस्अ‍ॅप हे एक प्रभावी साधन बनले आहे. यामुळे समाजातील प्रत्येक वयोगटातील लोकांच्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे. जवळजवळ सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे माहिती-तंत्रज्ञान विभाग (आयटी सेल) या व्यासपीठाचा वापर खोटा प्रचार करण्यासाठी, आपापल्या पक्षाचे-नेत्याचे-विचारधारेचे समर्थन करण्यासाठी किंवा विरोधकांची भूमिका खोडून काढण्यासाठी करताना दिसतात. त्याचप्रमाणे धार्मिक संघटना आणि कट्टरपंथी विचारधारा पसरवणारे गट समाजात द्वेष आणि हिंसाचार पेरण्याचे कामही या माध्यमातून करत आहेत. माणूस हा मुळात जिज्ञासू असतो आणि त्याला ज्ञानाची भूक असते. व्हॉटस्अ‍ॅपवर येणारे अशाप्रकारचे मेसेज ही भूक भागवण्याचा प्रयत्न करतात, हे वास्तव आहे.

मानवी मेंदू नैसर्गिकरीत्या ‘कन्फर्मेशन बायस’ म्हणजेच पूर्वग्रह पुष्टीच्या आहारी जातो. आपल्या स्वतःच्या विचारसरणीला किंवा श्रद्धेला खतपाणी घालणारा एखादा संदेश समोर आला की, आपले मन त्याची सत्यता न तपासता तो स्वीकारते. यालाच जोडून ‘इल्यूसरी ट्रुथ इफेक्ट’ काम करतो. म्हणजे एखादी खोटी गोष्ट वारंवार वेगवेगळ्या समूहातून आपल्या वाचनात आली, तर मेंदूला ती खरी वाटू लागते. या प्रक्रियेत तर्कशक्तीपेक्षा भावनांना अधिक महत्त्व दिले जाते. दुसरीकडे, सामाजिक स्थान टिकवून ठेवण्याची ओढदेखील याला कारणीभूत ठरते. आपल्या कौटुंबिक किंवा मित्रपरिवाराच्या गटात आपण किती ‘अपडेटेड’ आहोत किंवा आपल्याला किती ‘गुप्त’ माहिती ठाऊक आहे, हे दाखवण्याच्या नादात अनेक जण संदेश फॉरवर्ड करत सुटतात. यातून एक प्रकारचे आभासी समाधान मिळते. प्रत्यक्षात समाजात चुकीची माहिती आणि द्वेष पसरण्यास मदत होते. माहितीचा स्रोत न तपासता त्यावर विश्वास ठेवणे ही या युनिव्हर्सिटीची सर्वात मोठी त्रुटी आहे.

अशा चुकीच्या संदेशांमुळे देशात अनेक गैरप्रकार घडले आहेत. काही वर्षांपूर्वी मुले पळवण्याच्या अफवांमुळे काही निष्पाप लोकांची हत्याही याच व्हॉटस्अ‍ॅप युनिव्हर्सिटीच्या कृपेने झाली होती. हिंसेच्या नियोजित कटांमागे अनेकदा या विद्यापीठातून मिळालेले ‘ज्ञान’ कार्यरत असते. सामान्य लोकांच्या धारणा आणि विचार घडवण्यात इतिहासकारांची भूमिका मर्यादित असते; परंतु आजच्या काळात तर या तज्ज्ञांचीच थट्टा उडवली जात आहे. वैज्ञानिकांच्या तार्किक सिद्धांतांना केराची टोपली दाखवली जात आहे. राजकीय शक्ती आपल्या फायद्यासाठी इतिहास आणि विज्ञानाचे विकृत रूप सादर करून लोकांमध्ये आपली विचारधारा रुजवत आहेत. अशा स्थितीत सत्य दडून राहते आणि विविध समाजघटक आपला अजेंडा अचूकपणाने राबवतात. जागतिक घडामोडी असोत, युद्ध असो किंवा आरोग्यविषयक सल्ला, रेसिपी, नोकरीविषयक माहिती असा अमर्याद माहितीचा खजिना पेट्या भरून व्हॉटस्अ‍ॅपवर ओतला जात असतो. विशेष म्हणजे, तिचे वाचन मोठ्या प्रमाणावर केले जाते. त्यामुळेच आज प्रत्येक जण स्वतःला डॉक्टर, पोलीस, पत्रकार, संपादक किंवा वैज्ञानिक समजू लागला आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर व्हॉटस्अ‍ॅप युनिव्हर्सिटीतील पदवीधरांकडे तयार असते. बेरोजगारी, भूक बळी किंवा गुन्हेगारीच्या बातम्यांमध्येही अशी काही काल्पनिक जाळी विणली जाते, ज्यामुळे वास्तवाचा विसर पडतो.

न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की, समाजमाध्यमांचा वापर करणार्‍या प्रत्येक व्यक्तीने आपण काय फॉरवर्ड करत आहोत, याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. केवळ ‘मला हा संदेश आला म्हणून मी पाठवला’ हे समर्थन कायदेशीर चौकटीत बसत नाही. माहितीची सत्यता न तपासता तिचा प्रसार करणे हे समाजाप्रति असलेल्या कर्तव्याचे उल्लंघन मानले जाऊ शकते. लोकशाहीत लोकमत तयार होण्यासाठी अचूक माहितीचा पाया आवश्यक असतो. हा पायाच खोट्या माहितीवर आधारित असेल, तर लोकशाही धोक्यात येऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाची ही टिप्पणी म्हणजे डिजिटल युगातील नागरिकांच्या नैतिक आणि कायदेशीर जबाबदारीची जाणीव करून देणारा एक महत्त्वाचा इशारा आहे. यामुळे माहितीच्या अधिकारासोबतच माहितीच्या सत्यतेची जबाबदारीदेखील तितकीच महत्त्वाची ठरते.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने आपल्या अहवालात म्हटले आहे की, जगासाठी सध्या सर्वात मोठा धोका ‘मिसइन्फॉर्मेशन’ म्हणजेच चुकीची माहिती हा आहे. ज्यांच्याकडे कमी ज्ञान असते, तेच जास्त फुशारक्या मारतात, असे जुन्या काळी म्हटले जात असे. बनावट बातम्यांच्या संदर्भात ही म्हण तंतोतंत लागू होते. अशा चुकीच्या, अर्धवट, दिशाभूल करणार्‍या माहितीमुळे भविष्यात हे विद्यापीठ लोकांसाठी मोठे संकट ठरणार आहे. येणार्‍या काळात ‘फॅक्ट चेक’ म्हणजेच सत्यता पडताळणीच्या कामाची गरज अधिक वाढणार आहे. अशा स्थितीत नागरिकांनी सावध राहून आपली स्वतंत्र विचारसरणी विकसित करणे आवश्यक आहे. सामान्य जनतेच्या धारणा बंधुभाव जोपासणार्‍या असायला हव्यात. जनतेचा विचार हा वैज्ञानिक द़ृष्टिकोनावर आणि भारतीय राष्ट्रवादाच्या मूल्यांवर आधारित असावा. सामाजिक संस्कार आणि कौटुंबिक मूल्ये वाचवण्याचे आव्हान आज आपल्यासमोर आहे. त्यामुळेच समाजाने व्हॉटस्अ‍ॅप विद्यापीठाच्या अर्धवट ज्ञानापासून दूर राहून विवेकाने वागणे हेच हिताचे ठरेल. विवेकबुद्धीचा वापर करणे हाच या माहितीच्या महापुरातून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news