Bhandara Gondia Polling Booths AI photo
भंडारा

Bhandara Gondia MLC Election | भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणूक : ४ मतदान केंद्रांवर ४५७ मतदार बजावणार हक्क

मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचे वितरण

पुढारी वृत्तसेवा

Bhandara Gondia Polling Booths

भंडारा: महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ अंतर्गत भंडारा-गोंदिया मतदारसंघासाठी १८ जून रोजी होणाऱ्या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. बुधवारी, जिल्हाधिकारी कार्यालयात चारही मतदान केंद्रांवरील मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचे वितरण करण्यात आले.

यानंतर मतदान पथके संबंधित केंद्रांकडे रवाना करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सावनकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण, उपजिल्हाधिकारी महादेव जोरवार, उपजिल्हाधिकारी जे. पी. लोंढे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी १८ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीत एकूण ४५७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीसाठी भंडारा जिल्ह्यात दोन आणि गोंदिया जिल्ह्यात दोन अशी एकूण चार मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

भंडारा जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी कार्यालय, भंडारा तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय, साकोली येथील मंडळ अधिकारी यांच्या खोलीत मतदान केंद्र राहणार आहेत. तर गोंदिया जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथील खोली क्रमांक ४ आणि तहसील कार्यालय, सडक अर्जुनी येथील मीटिंग हॉलमध्ये मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

भंडारा येथील मतदान केंद्रावर जिल्हा परिषद भंडारा, नगर परिषद भंडारा, तुमसर, पवनी आणि नगर पंचायत मोहाडी येथील १६६ मतदार मतदान करतील. साकोली मतदान केंद्रावर नगर परिषद साकोली, नगर पंचायत लाखनी व लाखांदूर येथील ६१ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयातील मतदान केंद्रावर जिल्हा परिषद गोंदिया, नगर परिषद गोंदिया, तिरोडा व गोरेगाव येथील १५४ मतदार मतदान करतील. तर सडक अर्जुनी येथील मतदान केंद्रावर नगर परिषद सालेकसा तसेच नगर पंचायत देवरी, सडक अर्जुनी व अजुनी (मोरगाव) येथील ७६ मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.

या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकेचा वापर करण्यात येणार आहे. मतदारांना उमेदवारांना पसंतीक्रम देऊन मतदान करावे लागणार असून मतदानाची गोपनीयता अबाधित राखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतदान करताना मतदाराचा स्वतंत्र निर्णय आणि मतदानाची गोपनीयता राखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहा मतदान पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

निवडणुकीसाठी वैनगंगा सभागृह, भंडारा येथे सुरक्षा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तर मतमोजणीची व्यवस्था पोलिस बहुउद्देशीय सभागृह, भंडारा येथे करण्यात आली असून २२ जून २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.

पर्यटनवारीवरुन आज परतणार मतदार

निवडणुकीतील उमेदवार ठरल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीने आपल्या मतदारांना पर्यटनवारीसाठी विविध ठिकाणी रवाना केले. हे मतदार आता थेट मतदानाच्या वेळीच मतदान केंद्रांवर दाखल होणार आहेत.

उमेदवार असे

अविनाश ब्राम्हणकर-महायुती

नरेश ईश्वरकर- अपक्ष (काँग्रेस समर्थित)

सचिन कुंभलकर- (अपक्ष)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT