विदर्भ

नागपूर : नायलॉन मांजावर कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना

अनुराधा कोरवी

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय हरित लवादाने पतंगबाजी करत असताना नायलॉन धागा ( पतंगाचा मांजा )  वापरण्यास बंदी घातली आहे. मात्र, तरीही शहरात हा नायलॉन धागा वापरला जात असल्याचे दिसून येत आहे. आता यासंदर्भात कठोर निर्णय घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एका समितीची घोषणा केली आहे. निर्मितीच्या ठिकाणी धाडी टाकण्यापासून तर जनजागृती करण्यापर्यंत ही समिती कारवाई करणार आहे.

जिल्हाधिकारी आर. विमला यांनी यासंदर्भात आज (दि.२२) रोजी एक निर्देश काढून समिती घोषित केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर निर्देश देताना न्यायालयाने विदर्भातील प्रत्येक शहरात विशेष पथक स्थापन करण्याचा आदेश दिला आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करताना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी नागपूर जिल्ह्यात व्यापक जनजागृती करणे, बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, तसेच अशा पद्धतीचे उत्पादन करणाऱ्या ठिकाणांना शोधून कारवाई करण्यासाठी या विशेष पथकाची नेमणूक केली आहे.

यामध्ये महानगरपालिका आयुक्त, पोलीस विभागाच्या विशेष शाखेचे उपायुक्त, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, सायबर सेल प्रमुख, पर्यावरण व प्रदूषण विभाग, नागपूर मेट्रो विभाग, तसेच जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका शाखा यांचा समितीमध्ये सहभाग केला जाणार आहे. ही समिती येणाऱ्या काळात शहरातील या दुर्घटनेसंदर्भात बारकाईने लक्ष ठेवणार आहे.

जिल्हाधिकारी आर. विमला यांनी अशा पद्धतीचा ( पतंगाचा मांजा )  मांजा न वापरता पतंगोत्सव साजरा करावा. घरातील प्रत्येक वडीलधाऱ्यांनी आपला मुलगा कोणता मांजा वापरतो? याकडे लक्ष द्यावे. गेल्या काही दिवसात पंतगाचा मांजा अडकून जीवाला मुकण्याच्या गंभीर घटना घडलेल्या आहेत. तसेच शहरांमध्ये पुन्हा अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी नागरिकांनी जागरूक राहून सहकार्य करावे. गरज भासली तर पोलिसांना अवगत करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT