विदर्भ

अमरावती: नांदगावचे ८५० वर्ष पुरातन श्री खंडेश्वराचे देवालय

अविनाश सुतार

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: नांदगाव खंडेश्वर (जिल्हा अमरावती) येथील सुमारे ८५० वर्षांपूर्वीचे भगवान खंडेश्वराचे भव्य असे महादेवाचे शिवालय आहे. महाशिवरात्रीला या शिवालयामध्ये दरवर्षी हजारो भाविक श्रद्धेने येतात. निसर्गरम्य परिसरात वसलेले हे ऐतिहासिक शिवालय दगडांनी बांधले आहे. या मंदिरातील कोरीव शिल्प आणि रेखीव बांधकाम हे अतिशय सुंदर आहे. या शिवलायाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या कळसावर कधीही कावळा किंवा कबूतर बसत नाहीत.

शिवालयाचा इतिहास

नांदगाव खंडेश्वर येथील खंडेश्वराचे हे पुरातन शिवालय राजा रामदेवरायाच्या कारकिर्दीत शके ११७७ मध्ये आनंद सवत्सरी म्हणजे इसवी सन १२२४ ते ५५ या काळात बांधण्यात आले आहे. हेमाडपंथी वास्तुशिल्पकलेच्या उत्कृष्ट कलाकृती या शिवालयाच्या दगडी भिंतीवर कोरण्यात आलेल्या आहेत. या शिवालयासाठी विशिष्ट पद्धतीने तयार केलेल्या विटांची जोडणी करण्यात आली आहे. येथील शिवालयाच्या विटा आजही पाण्यावर तरंगतात, असे म्हटले जाते. राजा रामदेवरायाचा पंतप्रधान हेमांद्रीपंत यांनी हे पुरातन शिवालय बांधल्याची नोंद देवनागरी लिपीत कोरलेल्या शिवलेखात आढळून येते. कौंडिन्यमुनींच्या शिष्यात खंड्या नावाचा शिष्य होता. याच खंड्याने स्थापन केलेला महादेव म्हणजेच खंडेश्वर होय. या खंडेश्वराच्या कृपा छत्राखाली नांदणारे गाव म्हणजे नांदगाव खंडेश्वर होय, अशी श्रद्धा या परिसरातील नागरिकांची आहे.

अमरावतीतील जिल्ह्यातील नांदगाव येथील श्री. खंडेश्वर शिवालय हे अत्यंत पुरातन आहे. या शिवालयाचे वैशिष्ट्य असे आहे की, शिवालयाच्या पूर्वेकडील दर्शनी दारावर प्राचीन शिल्पकारांची नक्षीकांत शिल्पे आजही लक्ष वेधून घेतात. या शिवालयात खोल गाभाऱ्यात प्राचीन शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. शिवलिंगाच्या गाभाऱ्याच्या उत्तरेकडे शिवपार्वतीचे मंदिर आहे. या ठिकाणी शिवाने पार्वतीला मांडीवर घेतले असल्याची काळ्यापाषाणातील मूर्ती आहे. तर, पश्चिमेकडील मंदिरामध्ये नृसिंहाची मूर्ती हिरण्यकश्यपूला मांडीवर घेऊन आपल्या तीक्ष्णनखानी त्याचे पोट फाडून वध करताना दिसत आहे. या तीनही देवळांना जोडणारा गाभारा एकच असून, तो अतिशय प्रशस्त असा आहे. शिव मंदिराच्या या गाभाऱ्यात मध्यभागी शिवाचे वाहन नंदी भाविकांना आकर्षित करतो अशा भव्य स्वरूपात स्थापन करण्यात आला आहे. या शिवालयाच्या सभोवताली पक्क्या बांधणीचा दगडी परकोट आहे. मंदिराचे महाद्वार दक्षिणेकडे असून, त्यासमोर अष्टभुजा देवीचे मंदिर आहे. पूर्वेकडे उंच अशी दीपमाळ असून, त्यासमोर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा काही वर्षांपूर्वीच बसवण्यात आला आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत पावसाळ्यात हे मंदिर कधीही गळले नाही.

या शिवालयाला आहे चावी

नांदगाव खंडेश्वर येथील शिवालयाच्या विविध वैशिष्ट्यांपैकी येथील शिवालयाच्या बांधकामामध्ये दगडांच्या आड एक चावी आहे. ही चावी जर काढली तर मंदिर कोसळेल अशी आख्यायिका आहे. या चावीची देखील भाविक पूजा करतात या चावीला हात लावला तर ती हलते. मात्र, ती त्या दगडांमधून निघत नाही, या शिवालयाची पाहणी करण्यासाठी काही वैज्ञानिक येथे आले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार या शिवालयावर वीज पडू नये यासाठी केलेली खास व्यवस्था म्हणजे ही चावी असल्याचे त्यांनी सांगितले असल्याचे येथील नागरिक सांगतात. या शिवालयाच्या कळसावर कावळा, कबूतर बसत नाहीत असे सुद्धा म्हटले जाते – या कळसावर केवळ रान पोपटांचा थवा नियमित असतो. मात्र, मंदिराच्या कळसापर्यंत आजपर्यंत कधीही कावळा किंवा कबूतर गेले असे कधी पाहिल्या गेले नाही.

दर्शनाने मिळते काशीचे पुण्य

नांदगाव खंडेश्वर येथील शिवालयांसह लगतच्या बोंडेश्वर आणि कोंडेश्वर या शिवालयातील शिवलिंगाचे महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शन घेतले, तर काशी घडल्याचे पुण्य मिळते, असे सांगितले जाते. खंडेश्वर मंदिराच्या बांधकामाची वीट पाण्यावर तरंगते. ज्या टाक्यांमध्ये ही वीट तरंगते ते टाके आज देखील देखील येथे उपलब्ध आहे. या मंदिराच्या कळसालगत भुयारा सारखे स्थान तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी पूर्वी ऋषीमुनी होमहवन करीत असत, अशी माहिती देखील या परिसरातील भाविक सांगतात.

हिरव्यागार झाडांनी बहरला परिसर

नांदगाव खंडेश्वर पासून काहीशा उंचावर श्री.खंडेश्वराचे शिवालय उभारण्यात आले आहे. या मंदिर परिसरात वड, उंबर, कडुलिंब, आंबा ही वृक्ष मंदिर परिसराच्या सौंदर्यात भर घालीत आहेत. येथील परिसरात बकुळीच्या फुलांचा सडा सर्वत्र भरलेला दिसतो. या शिवालयाचा संपूर्ण परिसर अतिशय शांत आणि हिरव्यागार झाडांनी भरला असल्यामुळे शिवालयात येणाऱ्या भाविकांना आगळी वेगळी ऊर्जा या ठिकाणी प्राप्त होते, असा अनुभव येतो.

दरवर्षी महाशिवरात्रीला येथे सतत तीन दिवस भव्य अशी यात्रा भरवण्यात येते. यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रासह लगतच्या राज्यातील भाविक भक्त येथे मोठ्या प्रमाणात दर्शनाचा लाभ घेतात येथे दरवर्षी किमान एक ते दोन लाख भाविक भक्त दर्शनाला येत असल्याची माहिती आहे. या शिवालयाला शासनाने तीर्थक्षेत्राचा ब वर्ग दर्जा दिलेला आहे. हे उल्लेखनीय !

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT