सोलापूरात महाशिवरात्रीनिमित्त शिवालये होणार शिवमय | पुढारी

सोलापूरात महाशिवरात्रीनिमित्त शिवालये होणार शिवमय

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  कोरोना महामारी ओसरल्यानंतर दोन वर्षांनंतर यंदा शिवालयांमध्ये शनिवार, 18 फेब्रुवारी रोजी होणार्‍या महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. दर्शनासाठी होणार्‍या गर्दीचे नियोजन मंदिरांचे पुजारी व विश्वस्त करत आहेत.

सोलापूर शहरासह ग्रामीण भागामध्ये मोठ्याप्रमाणात शिव मंदिरे आहेत. बाळी वेसेतील मल्लिकार्जुन मंदिर, साखर पेठेतील नीलकंठेश्वर मंदिर, विजयपूर रस्त्यावरील रेवणसिद्धेश्वर मंदिर, कन्ना चौकातील शिवयोगी सिद्धरामेश्वरांचे जन्मस्थान सिद्धरामेश्वर मंदिर, अक्कलकोट रस्त्यावरील पंचमुखी परमेश्वर व वीरतपस्वी मंदिर, मिलिटरी कँटिन परिसरातील जयशंकर मंदिर, अक्कलकोटमधील मल्लिकार्जुन मंदिर, कासेगाव, हत्तरसंग कुडल येथील संगमेश्वर मंदिर, माचणूर, जेऊर (ता. अक्कलकोट) येथील काशीलिंग मंदिर, रांझणीतील महादेव मंदिर यासह सम्राट चौकातील ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शिव मंदिरांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त दर्शन आणि विविध धार्मिक विधींसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने जय्यत तयारी करण्यात येत आहे.

शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर

ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या गर्भ मंदिरात पहाटे 6 वा. काकडा आरती, 7.30 वा. योग समाधीला रूद्राभिषेक, सामूहिक ओम नम: शिवाय मंत्र जप, आरती, स. 8.30 वा. गर्भ मंदिरात रूद्राभिषेक, नामावळी, आरती, योग समाधी व गर्भ मंदिरातील मूर्तीला तांदूळ पूजा, रात्री 8.30 वा. रूद्राभिषेक, मंत्रजप, रात्री 10 वा. योग समाधी व पालखी प्रदक्षिणा, रात्री 11.30 वा. गभर्र् मंदिरात रूद्राभिषेक, आरती, असे कार्यक्रम आहेत. यासाठी पुजारी शिवशंकर हब्बू, आनंद हब्बू, गुरूराज हब्बू, ओंकार हब्बू, शशिकांत हब्बू परिश्रम घेत आहेत.

मल्लिकार्जुन मंदिर

बाळी वेस येथील मल्लिकार्जुन मंदिरामध्ये पहाटे 4 वा. भाविक रूद्राभिषेक व दुग्धाभिषेक करणार आहेत. त्यानंतर हिरेहब्बू परिवारातर्फे दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे. रात्री 11.30 वा. दुग्धाभिषेक व आरती होणार येणार आहे. दिवसभर भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने दर्शनासाठी नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सिद्धरामेश्वर यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू, सागर हिरेहब्बू, संतोष हिरेहब्बू हे नियोजन करत आहेत.

नीलकंठेश्वर मंदिर

साखर पेठेतील कुरहिनशेट्टी जांड्रा समाज संस्थेच्या नीलकंठेश्वर मंदिरात अध्यक्ष बालाजी मुटकिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी महाभिषेक, रूद्राभिषेक, नंदी पूजा, मृत्यूंजय महायज्ञ होणार आहे. सायंकाळी 6 वा. पूर्णाहुती, दीपोत्सव होणार आहे. महाआरतीचा लिलाव काढण्याची पद्धत असून याद्वारे निवडलेले यजमान महाआरती करतात. यंदा राजेंद्र द्यावरकोंडा हे महाआरती करणार आहेत, असे सचिव सत्यनारायण द्यावरकोंडा यांनी सांगितले. 68 लिंग भजनी मंडळाचे शाम मादगुंडी यांच्यासह 25 सहकारी रात्री भजन करणार आहेत.

बीकेतर्फे योग समाधी प्रतिकृती

ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्यावतीने यंदा महाशिवरात्रनिमित्त विजयपूर रस्त्यावरील मैदानावर शिवयोगी सिद्धरामेश्वर योग समाधी, 68 लिंग, योगदंड, भोलेनाथ शंकर मूर्ती, गणपती मूर्ती यासह विविध प्रतिकृती साकारण्यात आल्या असून याचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी 5.30 वा. खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आ. सुभाष देशमुख, पोलिस निरीक्षक बाळकृष्ण पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी सोमप्रभादीदी, सदीक्षादीदी, उज्ज्वलादीदी, कन्नुरे भाई, बाळू भाई, तुकाराम मस्के हे परिश्रम घेत आहेत.

होटगी बृहन्मठातर्फे पालखी सोहळा

बाळी वेस येथील होटगी मठापासून ते अक्कलकोट रस्त्यावरील वीरतपस्वी मंदिरापर्यंत पंचाचार्यांच्या मूर्तीची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे, असे सचिव शांतय्या स्वामी यांनी सांगितले. प्रारंभी मानकरी थोबडे यांच्या घरात मूर्तीला अभिषेक करुन ही मूर्ती बाळी वेस मठात आणणार. त्यानंतर सनई-चौघड्यांसह विविध वाद्यांच्या निनादात काशीपीठाचे नूतन जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामी, होटगी बृहन्मठाचे मठाधिपती चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक अक्कलकोट रस्त्यावरील मठाकडे निघेल. दुपारी 1 वा. ही मिरवणूक वीरतपस्वी मंदिरात पोहोचल्यानंतर स्वागत करण्यात येणार आहे. बृहन्मठ होटगी संस्थेचे विद्यार्थी लेझीम, झांज पथकासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम या मिरवणुकीत सादर करणार आहेत.

Back to top button