विदर्भ

नागपूर शहरातील क्रीडांगणांच्या विकासासाठी १०० कोटी

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आपल्या शहरातील क्रीडा विश्वाला बळकटी देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील मैदानांच्या विकासाची संकल्पना मांडली आहे. शहरातील क्रीडांगणांच्या विकासासाठी राज्य शासनातर्फे १०० कोटी रुपये देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील क्रीडांगणांच्या निर्मिती आणि विकासाची संकल्पना बोलून दाखविली व त्यासाठी राज्य शासनातर्फे सहकार्याची मागणी केली होती.

१५ दिवसांपासून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा रविवारी रात्री डब्ल्यूडब्ल्यूई मधील वर्ल्ड हेवी वेट चॅम्पियन ग्रेट खली यांच्या विशेष उपस्थितीत यशवंत स्टेडियवर समारोप झाला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रणेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी, सहसंयोजक डॉ. पीयूष आंबुलकर, माजी आमदार सुधाकर कोहळे, सुधीर दिवे यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी नासुप्रच्या माध्यमातून मैदानाचा विकास केला जाईल. धंतोली येथील यशवंत स्टेडियमचा सुद्धा पुनर्विकास प्रस्तावित असून त्यासाठी आवश्यक सर्व परवानगी, यूजरचेंज राज्य सरकारकडून लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय मानकापूर येथील क्रीडा संकुल अत्याधुनिक करून त्याच्या देखरेखी संदर्भात प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. हॉकी मैदान तयार करून शहरातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू पुढे येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

खेळातून व्यक्तित्व विकास : ना. नितीन गडकरी

खेळातून व्यक्तित्वाचा विकास होतो आणि त्यातून कर्तृत्व निर्माण होते. शहरातील प्रत्येक खेळाडूला खेळण्यासाठी उत्तम मैदाने तयार करून त्यातून त्यांच्या व्यक्तित्व विकासाला चालना देणे हे ध्येय असल्याचे यावेळी खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रणेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

महाराष्ट्र खेळात क्रमांक एकवर येईल : ग्रेट खली

आज हरियाणा खेळात देशात क्रमांक एकवर आहे. नागपूर शहराला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे दोन मोठे नेते मिळाले व दोन्ही नेते खेळासाठी प्राधान्याने दुरदृष्टीकोन ठेवून कार्य करीत आहे. या दोन्ही नेत्यांच्या खेळासाठी असलेल्या कार्यामुळे लवकरच महाराष्ट्र खेळात क्रमांक एकवर येईल, असा विश्वास डब्ल्यूडब्ल्यूई मधील वर्ल्ड हेवी वेट चॅम्पियन ग्रेट खली यांनी व्यक्त केला.

अंकित तिवारींची एंट्री आणि स्टेडियममध्ये जल्लोष

सर्वोत्तम पुरूष पार्श्वगायक आणि सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक हे दोन्ही फिल्मफेअर पुरस्कार पटकाविणारा अंकित तिवारी यांनी आपल्या खास शैलीत मंचावर एंट्री केली आणि उपस्थित प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय सोहळ्यात आपल्या गाजलेल्या गीतांनी अंकित तिवारीने नागपूरकरांना रिझविले. अंकित तिवारी आणि त्यांच्या चमूद्वारे सादर करण्यात आलेल्या गीतांवर तरुणाईने ताल धरला.

विजय मुनीश्वर यांना क्रीडा महर्षी पुरस्कार प्रदान

क्रीडा महर्षी पुरस्कार द्रोणाचार्य आणि छत्रपती पुरस्कार विजेते विजय मुनीश्वर यांना मान्यवरांच्या हस्ते क्रीडा महर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५ लक्ष रूपये आणि सन्मानचिन्ह प्रदान करून ना.नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रेट खली व अन्य मान्यवरांनी मुनीश्वर यांच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याचा सन्मान केला. दरम्यान, यावेळी विविध खेळांच्या खेळाडूंना क्रीडा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. २५ हजार रूपये व सन्मानचिन्ह देउन २३ खेळाडूंना क्रीडा भूषण म्हणून सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT